वाळवा : पेटून उठल्याशिवाय स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही. जमिनीवर घट्ट पाय रोवून जिद्द आणि आत्मविश्वास ठेवल्यास स्पर्धा परीक्षेतसुद्धा यश मिळते, असे प्रतिपादन वाळवा शिराळा पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केले.
वाळवा येथील गुरुवर्य लालासाहेब पाटील वाचनालयाच्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. वाचनालयाचे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील अध्यक्षस्थानी होते.
दिलीपराव पाटील म्हणाले, ‘‘वाचनालयाची ५०लाखांची भव्य दिव्य इमारत दिवाळीपूर्वी उभी राहील. ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्यासाठी स्पर्धा परीक्षेचे सर्व सोयींनीयुक्त सेवा केंद्र तयार होईल.’’
ग्रामपंचायत सदस्य मिलिंद थोरात, राजेंद्र औंधकर, बजरंग गावडे, माणिक पाटील, डॉ. संतोष कावडे, देवदास भंडारे, महावीर होरे प्रमुख उपस्थित होते. उषा जाधव, दिव्या जगताप, तुषार नवले, अमोल लाड या विद्यार्थ्यांनी संयोजन केले.