लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विकेेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सांगली जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी कडकडीत बंद पाळून कोरोनाची साखळी तोडण्याच्या शासन व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना बळ दिले. शहरी भागांपासून छोट्या गावांपर्यंत सर्वत्र रस्ते, चौक, बाजारपेठा ओस पडल्या.
जिल्ह्यात शासनाने जाहीर सोमवार ते शुक्रवारपर्यंतच्या निर्बंधांबद्दल गेल्या काही दिवसांपासून व्यापारी व व्यावसायिकांमधून संताप व्यक्त केला जात असताना विकेंड लॉकडाऊनला मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्या गोष्टींना शासनाने व जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये मुभा दिली ते व्यवसायही बंद राहिले. रस्ते, चौक, बाजारपेठा शांत झाल्या. दिवसभर गावे, शहरे निर्मनुष्य असल्याचे भासत होती.
जिल्ह्यात वाळवा, शिराळा, मिरज, तासगाव, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर या सर्व तालुक्यांमध्ये शांतता पसरली. शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झालेला लॉकडाऊन सोमवारी सकाळपर्यंत कायम राहणार आहे. शुक्रवारी रात्रीपासून लोकांनी लॉकडाऊनला प्रतिसाद दिला. शुक्रवारी आठच्या ठोक्याला सर्व बाजारपेठा व व्यवसाय बंद झाले. संचारबंदीलाही तसाच प्रतिसाद लाभल्यामुळे शांतता दिसून आली.
शहरांसह छोटी छाेटी गावेही ओस पडल्याचे चित्र शनिवारी जिल्ह्यात दिसून आले. नागरिक घराबाहेर न पडल्यामुळे पोलिसांवर फारसा ताण पडला नाही. जिल्ह्यात केवळ दवाखाने, डायग्नोस्टिक सेंटर्स, औषधांची दुकाने, एटीएम व पेट्रोलपंप सुरू राहिले. अन्य सेवा व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. शहरातील तसेच गावातील नेहमी गजबजणाऱ्या परिसरांमध्ये शुकशुकाट पसरला होता.
चौकट
पेट्रोलपंपही ओस
नागरिकच घराबाहेर न पडल्याने अनेक पेट्रोलपंप ओस पडली होती. वाहनांच्या प्रतीक्षेत कर्मचाऱ्यांना दिवसभर थांबावे लागले. पोलीस व सरकारी कर्मचारी वगळता पेट्रोलपंपावरही कुणी फिरकले नाही.
चाैकट
भाजीपाला वाहतूकही ठप्प
भाजीपाला वाहतुकीस मुभा दिली असली तरी भाजीपाला वाहतूक शनिवारी होऊ शकली नाही. त्यांनी स्वत:हून लाॅकडाऊनमध्ये सहभाग घेतला. याशिवाय इतर मालवाहतूक, प्रवासी वाहतूकही पूर्णपणे बंद राहिली. बसस्थानकेही भकास दिसत होती.