कोकरुड : गेल्या सहा दिवसांपासून शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात कडक लॉकडाऊनचा अंमल केला आहे. कोकरुड पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. जिल्हाहद्दीवरील रस्ते बंद झाल्याने प्रवास करणाऱ्यांचीही संख्या घटली आहे. तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीसपाटील पुन्हा सक्रिय झाले आहेत.
कोकरुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी गावनिहाय भेटी देऊन तेथील दक्षता समितीच्या बैठका घेऊन गावातील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी सक्रिय केले आहे. कोकरुड नदी पूल आणि मेणी फाटा येथील जिल्हाबंदी करत बिळाशी-भेडसगाव, कोकरुड-रेठरे वारणा, चरण-सोंडोली, आरळा-शितूर, मणदूर-उखळू हे रस्ते बंद करण्यात आले आहेत. विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करत काहींना प्रसाद देणे सुरू केल्याने फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. शिराळा बस आगाराने पश्चिम भागात येणाऱ्या सर्व बसेसच्या फेऱ्या पूर्ण बंद केल्या आहेत.
कऱ्हाड बस आगाराची शेडगेवाडी-कऱ्हाड ही बस सकाळ, संध्याकाळ ये-जा करत आहे; पण एकही प्रवासी मिळत नाही. कोकरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, उपनिरीक्षक संजय पाटील, सहायक फौजदार शंकर कदम हे सहकाऱ्यांच्या मदतीने कडक अंमलबजावणी करत असल्याने बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.