जत : जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पक्षकारांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. याला वरिष्ठांनी आळा घालावा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.
जत तालुका जिल्ह्यात विस्ताराने माेठा आहे. सध्या संख येथे अपर तहसीलदार कार्यालय झाल्याने महसूल विभागाचा थोडासा कार्यभार कमी झाला आहे; परंतु जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयातच नाेंद हाेतात. यामुळे येथे नेहमीच गर्दी असते. नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन खासगी एजंटामार्फत वारेमाप लूट सुरू आहे. सीमा भागामुळे अनेकांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान नाही. मराठी लिहिता-वाचता येत नसल्यामुळे खासगी एजंटची साखळीच कार्यरत आहे. या माध्यमातून सामान्य नागरिकांना लुटण्याचा धंदा राजरोस चालू आहे. कार्यालयात शासनाकडून नियुक्त दस्त लेखनिक व स्टॅप व्हेंडरपेक्षा झिरो लेखनिक व कर्मचारी तसेच एजंट यांचा वावर दिसून येतो. खेडेगावातून आलेल्या लोकांना कर्मचारी कोण व एजंट कोण, याचे काहीही ज्ञान नसल्यामुळे हे एजंट व अधिकाऱ्यांचे उखळपांढरे होत आहे. खासगी झिरो कर्मचारी आपणच अधिकारी असल्याच्या अविर्भावात वावरताना दिसतात.
या कार्यालयात सर्वसामान्य लोकांची आर्थिक पिळवणूक हाेत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठांचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही. तातडीने येथील एजंटांची साखळी माेडीत काढून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी संजय कांबळे यांनी केली आहे.