कडेगाव : प्रदेश युवक कॉँग्रेसच्यावतीने दलित अत्याचाराविरोधात २४ नोव्हेंबर रोजी अहमदनगर पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या अत्याचारप्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. या दहा दिवसात आरोपींना अटक झाली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिला.कदम म्हणाले की, भाजप नेत्यांनी निवडणुकीपूर्वी काळा पैसा परत आणणार, असे आश्वासन दिले होते. एलबीटी तसेच टोलबाबत भाजपने ‘यु टर्न’ घेतला आहे. मराठवाड्यातील दुष्काळप्रश्नी पंचनामे न करता मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आणि आता पंचनामे सुरू केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारा तसेच प्रशासनाचा अनुभव असणारा एकही मंत्री शासनात नाही. आगामी हिवाळी अधिवेशनावेळी नागपुरात विधानभवनावर आक्रमक मोर्चा युवक कॉँग्रेसच्या माध्यमातून काढणार आहे.युवक कॉँग्रेस माध्यमातून आता सोशल मीडियावर भर दिला जाणार आहे. सध्या सांगली, मिरजेत गॅस्ट्रोने थैमान घातले आहे. येथे सांगली जिल्हा व शहर युवक कॉँग्रेसच्या माध्यमातून जागृती मोहीम राबविली जाणार आहे. भारती हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रो साथ आटोक्यात आणण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे, असे कदम म्हणाले. (वार्ताहर)ऊस दरासाठीही रस्त्यावरऊसदरप्रश्नी आंदोलन करणारे आता सरकारमध्ये आहेत. आता ऊसदराबाबत सरकार काय भूमिका घेणार हे पाहू. ही भूमिका सरकारसाठी न्याय्य नसेल तर प्रदेश युवक कॉँग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करणार आहोत. ऊसदरासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रसंगी रस्त्यावरही उतरणार आहे, असे विश्वजित कदम म्हणाले.
दलित अत्याचाराविरूद्ध राज्यव्यापी आंदोलन
By admin | Updated: November 28, 2014 23:44 IST