तासगाव : तासगावमध्ये १५ मेपर्यंत कस्तुरबा रुग्णालयाचे काम पूर्ण करून काेविड हॉस्पिटल सुरु करण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनी आढावा बैठकीत दिले होते. मात्र हे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करीत तासगावात राष्ट्रवादीचे नगरसेवक, पदाधिकारी आक्रमक झाले. दहा दिवसात १०० बेडचे हॉस्पिटल सुरू झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत ऑक्सिजन प्लांट हॉस्पिटलसाठी मनुष्यबळ, अन्य कोणत्याही लागेल त्या मदतीसाठी आमदार सुमनताई पाटील यांच्याकडून प्रयत्न केले जातील असे आश्वासन राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांना दिले.
तासगाव नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या कस्तुरबा हॉस्पिटलला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी मंगळवारी सकाळी भेट दिली. येथील काम समाधानकारक गतीने सुरू नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी मुख्याधिकारी पाटील यांनी गतीने काम सुरू असून कमीत कमी वेळेत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र यावेळी झालेल्या चर्चेत हॉस्पिटलचे काम पूर्ण झाले तरी ऑक्सिजन प्लांट ऑक्सिजन बेड तयार करण्यासाठी लागणारे पाईप, जनरेटर महत्त्वाचे म्हणजे हॉस्पिटलसाठी आवश्यक कर्मचारी वर्ग यासाठी आतापासून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ठरले.
आमदार सुमनताई पाटील यांच्या आमदार फंडातून जी मदत लागेल ते करण्याचे आश्वासन यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी नगरसेवक बाळासाहेब सावंत, अभिजीत माळी, निर्मला पाटील, वैभव भाट, तानाजी पवार, शहराध्यक्ष गजानन खुजट, अभिजीत पाटील, अजय पाटील, अमोल शिंदे, राहुल शिंदे, स्वप्नील जाधव, परेश लुगडे, कमलेश तांबेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.