सांगली : महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. निवडी करताना विभागीय समतोल राखण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांनी केल्याचे दिसून आले. काँग्रेसचे दिलीप पाटील, हारूण शिकलगार, शिवाजी दुर्वे, स्वाभिमानी आघाडीचे जगन्नाथ ठोकळे, शांता जाधव, राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते, आशा शिंदे, जरीना बागवान या सात सदस्यांची स्थायी समितीवर निवड करण्यात आल्याचे महापौरांनी जाहीर केले. गेल्या पंधरा दिवसांपासून स्थायीत वर्णी लावण्यासाठी सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्त झाले होते. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन, स्वाभिमानीच्या दोन सदस्यांचा समावेश होता. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीनंतर सदस्य निवडीचा निर्णय घेतला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून इच्छुकांनी स्थायीत वर्णी लागावी, म्हणून पक्षाच्या नेत्यांकडे साकडे घातले होते. त्यामुळे स्थायी निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. सदस्य निवडीवरच सभापती निवडीचे भवितव्य अवलंबून असल्याने इच्छुकांनी नेत्यांकडे जोरदार प्रयत्न केले होते. कोणत्या शहरातील किती सदस्यांना संधी मिळणार, हासुद्धा विषय चर्चेचा होता. सत्ताधारी काँग्रेस तसेच विरोधी बाकावरील राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी आघाडीने तिन्ही शहरांना प्रतिनिधीत्व देण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसने सांगली, मिरजेला संधी देताना दिलीप पाटील यांच्या माध्यमातून सांगलीवाडीला स्थायीत स्थान दिले. सांगलीवाडीत अनपेक्षित यश काँग्रेसला मिळाल्याने स्थायी समितीवर सांगलीवाडीला संधी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने सांगली, मिरज आणि कुपवाड असा समतोल साधला. राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या अधिक होती. नगरसेवक राजू गवळी, कुपवाडचे शेडजी मोहिते, जुबेर चौधरी यांच्यासह माजी महापौर मैनुद्दीन बागवान, संगीता हारगे यांनीही प्रयत्न केले होते. (प्रतिनिधी)भाजपला ठेंगा; जगन्नाथ ठोकळे यांची वर्णीस्वाभिमानी आघाडीत भाजप, शिवसेना अशी फूट पडली आहे. गटनेते शिवराज बोळाज हे माजी आमदार संभाजी पवार समर्थक असल्याने स्थायी निवडीत पवार गटाचाच वरचष्मा राहण्याची शक्यता होती. निवडीत तसेच घडले. पवार गटाचे जगन्नाथ ठोकळे यांची वर्णी लागली. अपक्ष नगरसेविका शांता जाधव यांनी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांनाही पवार गटानेच संधी दिल्याचे सांगितले जात आहे. आघाडीत भाजप सदस्यांची संख्या अधिक असतानाही त्यांच्यापैकी कोणालाही संधी मिळू शकली नाही. सांगली-मिरजेतून विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्याबद्दल आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे व मुख्यमंत्रीपदी निवडीबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. एलबीटी सुरू ठेवण्याची घोषणा केल्याबद्दलही मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव किशोर जामदार यांनी मांडली. गौतम पवार यांचा विरोध नोंदवून ठराव संमत करण्यात आला.
‘स्थायी’त विभागीय समतोल
By admin | Updated: November 21, 2014 00:26 IST