गेल्या वर्षभरापासून एसटी महामंडळाचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. कोरोनाच्या काळात महामंडळाला २५ ते ३० कोटींचा तोटा सहन करावा लागला. ऐन कोरोनात तर कर्मचाऱ्यांना वेळेवर पगारही मिळाले नाही. अजूनही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही. आताही दोन महिन्यांतून पगार होत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
चौकट
वैद्यकीय बिले आठ महिने मिळेनात
महामंडळाकडील कर्मचारी, वाहक, चालकांना वैद्यकीय खर्च दिला जातो. शस्त्रक्रियेपासून ते औषधापर्यंतच्या खर्चाची बिले कर्मचाऱ्याकडून महामंडळाकडे सादर केली जातात. पण, जानेवारीपासून ही बिले धूळखात पडली आहेत.
चौकट
पगार दोन महिन्यांतून एकदा
१. एसटीचे वाहक, चालक आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडीत असतात. अगदी लांबपल्ल्याच्या गाड्यावर ते कुठलीही नाराजी व्यक्त न करताच जातात.
२. पण, कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नाही. कोरोनाच्या काळात तर पगारासाठी कर्मचाऱ्यांना हात जोडावे लागले होते.
३. जुलै महिन्याचा पगार ऑगस्टच्या अखेरीस देण्यात आला आहे. तर ऑगस्टच्या पगाराची अजून चर्चाच नाही.
चौकट
उपचारावर झालेला खर्च कोठून आणायचा?
१. एसटी आगाराकडे गेली २० वर्षे सेवा बजावित आहेत. वडिलांना मध्यतंरी हृदयविकाराचा त्रास झाला. त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्याचे बिल दिले आहे. पण अद्याप मंजूर झालेले नाही. - एसटी कर्मचारी
२. एसटी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले गेल्या आठ महिन्यांपासून देण्यात आलेली नाहीत. जवळपास ५० लाखांची बिले प्रलंबित आहेत. पगारही वेळेवर होत नाहीत. उपचारासाठी कोठून पैसे आणायचे, असा प्रश्न आहे. - अशोक खोत, अध्यक्ष कामगार संघटना
चौकट
उत्पन्न घटल्याने अडचणीत वाढ
कोरोनामुळे एसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. दररोज ७० लाखांचे उत्पन्न २० लाखांपर्यंत आले आहे. त्यामुळे वैद्यकीय बिले व इतर खर्चासाठी आर्थिक तरतूद करताना कसरत करावी लागत आहे. उत्पन्नाच बराच भाग डिझेलवर खर्च होतो. - मानिनी तेलवेकर, विभागीय लेखाधिकारी
चौकट
जिल्ह्यात एकूण आगार : १०
वाहक : १२३२
चालक : १४८४
अधिकारी : ५
कर्मचारी : १६७९