लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त महाराष्ट्रापासून दीड हजार किलोमीटरवरील केरळात जाऊन मराठी व्यावसायिकांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविले. मराठी बांधवांनी एकत्रित येऊन तेथील आडूर शहरात गणेशोत्सव साजरा केला. तेथे ‘गणपती बाप्पा मोरय्या’चा आवाज घुमला.
खानापूर, तासगाव, आटपाडी, खटाव, माण, सांगोला आदी तालुक्यातील मराठी बांधव सुवर्ण व्यवसायासाठी केरळ राज्यातील विविध शहरांत स्थायिक झाले आहेत. अनेक वर्षांपासून कुटुंबियांसह वास्तव्यात असलेल्या मराठी बांधवांनी मराठी संस्कृती जोपासली आहे.
महाराष्ट्रात धडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव केरळ राज्यात स्थायिक असलेले मराठी बांधव भक्तिभावाने साजरा करीत असतात. केरळ राज्यातील आडूर शहरात ‘आडूरचा राजा’ गणेश मंडळाने गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवाचे सातत्य कायम ठेवले आहे.
सुभाष पाटील, पोपट शिंदे, मोहन पाटील, तानाजी धनवडे, अधिक मोरे, उत्तम गोरड, शंकर थोरात, राजू शिंदे, प्रशांत पाटील, संजय पाटील, सुरेश सुर्वे, सचिन सूर्यवंशी, सुखदेव घोलप, विजय यादव, भरत साळुंखे, हेमंत थोरात, रमेश धनवडे, धनाजी घोलप, पृथ्वीराज माने, गोपीनाथ रावताळे यांनी नियोजन केले आहे.
चौकट :
आरतीचा मान नगराध्यक्षांना
मराठी बांधवांनी आडूर येथे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर आडूरचे नगराध्यक्ष डी. सजी आणि उपसभापती चिट्टीयन गोपकुमार यांना आरतीचा मान दिला. त्यानंतर कोरोनायोध्दा म्हणून काम करणारे डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर, पोलीस यांच्यासह प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.