सोनी : मिरज तालुक्यातील सोनी, पाटगाव, करोली (एम) येथील आमदार सुरेश खाडे यांचे लावलेले डिजिटल डोंगरवाडी उपसासिंचनच्या कार्यकर्त्यांनी उतरवायला लावले असून, पाणी मिळाल्याशिवाय कोणत्याही राजकीय नेत्यांना गावामध्ये प्रवेशास व डिजिटल लावण्यास बंदी केली असून, विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्काराच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.सोनीसह परिसरातील करोली (एम), पाटगाव येथील ग्रामस्थांनी म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळाल्याशिवाय विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही, बहिष्कार टाकण्याच्या निर्णयासह कोणत्याही राजकीय नेत्यांना गावामध्ये डिजिटल लावण्यास व सभा घेण्यास बंदी करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाच वर्षांमध्ये केलेला लेखाजोखा तयार करून ते डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आ. सुरेश खाडे यांचे कार्यकर्ते गावामध्ये डिजिटल लावत असताना डोंगरवाडी उपसा सिंचनचे कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी लावलेले फलक काढण्यास भाग पाडले व आलेले कार्यकर्ते फलक न लावताच मिरजेकडे परत गेले. यापूर्वी ही प्रा. सिध्दार्थ जाधव यांचा फलक उतवला होता. पाणी मिळाल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या संघर्ष समितीचे समन्वयक अरविंद पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या गावातील पाण्यासाठी राजकारण पेटण्याची शक्यता आहे.ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे नेत्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. (वार्ताहर)
सोनी परिसरात नेत्यांचे फलक उतरविले
By admin | Updated: August 17, 2014 22:35 IST