सांगली : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या (शुक्रवार) ३१ आॅक्टोबररोजी सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील आठ ठिकाणी एकता दौड होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. यामध्ये नागरिकांनी मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पटेल यांचे एकता, अखंडता, सुरक्षितता आणि निर्भयतेचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजता सांगली, मिरज शहरांबरोबरच जिल्ह्यातील आष्टा, इस्लामपूर, विटा, तासगाव, जत या नगरपालिकांमध्ये तसेच कडेगाव येथेही एकता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. सांगलीत सकाळी ८ वाजता शिवाजी स्टेडियम येथून ‘रन फॉर युनिटी’ या एकता दौडीस प्रारंभ केला जाणार आहे. ही दौड आमराई, वखारभाग, पटेल चौक, गणपती मंदिर चौक, टिळक चौक, हरभट रोड, राजवाडा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात येणार असून, याठिकाणी त्याची सांगता करण्यात येणार आहे. मिरज शहरातून सकाळी ८ वाजता मिशन हॉस्पिटल चौक येथून एकता दौडीस प्रारंभ केला जाईल. पुढे ही दौड महात्मा गांधी पुतळा, मिरज मार्केट, महापालिका कार्यालयापर्यंत जाऊन तेथे सांगता करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील या एकता दौडीत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सर्वच नागरिकांनी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच नामवंत खेळाडूंनीही सहभागी व्हावे, असे आवाहनही कुशवाह यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात आज ८ ठिकाणी एकता दौड
By admin | Updated: October 31, 2014 01:13 IST