सांगली : जिल्ह्यावरील दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन शहरातील लहान-मोठ्या मंडळांनी आपल्या खर्चामध्ये काटकसर करुन, तो निधी सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्यावर भर दिला आहे. वर्गणीतून गोळा झालेला निम्म्याहून अधिक निधी सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्याचा निर्णय बहुतांशी मंडळांनी घेतला आहे. पटेल चौक मित्रमंडळाने यावर्षीही रक्तदान शिबिर घेतले आहे. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणे, अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर त्यांनी यंदा पाऊण लाख खर्च करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते अजित सूर्यवंशी यांनी दिली. मोटार मालक संघटना प्रत्येकवर्षी सामाजिक उपक्रमांवर भर देते. त्यांच्याकडून कायमस्वरुपी रुग्णालय चालवण्यात येते. चालक, क्लिनरसाठी मोफत औषधोपचार करण्यात येतात. यंदा शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वखार भागातील लक्ष्मीनारायण मंडळाच्यावतीने यावेळी अनाथाश्रमातील विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण औषधोपचार करण्यात येणार आहे. यासाठी दोन अनाथाश्रम यावेळी ते दत्तक घेणार आहेत. वखारभागातीलच अष्टविनायक मंडळाने खर्चात काटकसर करुन शासकीय रुग्णालयातील गरजू लोकांवर औषधोपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मृत्यू पावलेल्यांचे पार्थिव त्यांच्या गावापर्यंत नेण्यासाठी मोफत शववाहिकेची सोय करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष केतन नावंधर यांनी दिली. कॉलेज कॉर्नरवरील शहीद भगतसिंग मंडळाने यंदा सलग दहा दिवस अन्नछत्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थापक शिवाजी खोत यांनी दिली. दररोज याचा दोन हजार भाविक लाभ घेत आहेत. गावभागातील रणझुंझार मंडळाने यावर्षी रक्तदान शिबिर तर घेतलेच आहेच, शिवाय खर्चात बचत करुन दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचाही निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष संदीप हेरवाडे यांनी दिली. वखारभागातील मित्रमंडळाने यावर्षीही पर्यावरणपूरक देखाव्यावर भर दिला आहे. या मंडळाकडून निधीची बचत करुन दत्त जयंतीला अन्नदान करण्यात येणार आहे. शहरात ४६० मंडळांची प्रतिष्ठापनासांगलीत लहान-मोठ्या ४६० मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. पोलीस व महापालिकेच्या सूचनेनुसार यंदा मंडळांचे मंडपही जवळपास निम्म्यावर आले आहेत. गतवर्षीपेक्षा वीस ते पंचवीस मंडळांची संख्या घटली आहे. बहुतांशी मंडळांनी खर्चात काटकसर करुन सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. महापालिकेकडे मात्र दाखल झालेल्या अर्जावरून मंडळांची संख्या सहाशेवर गेल्याचे दिसत आहे.
सांगलीच्या उत्सवाला सामाजिक रंग
By admin | Updated: September 21, 2015 00:05 IST