सांगली : हिसडा मारुन महिलांच्या गळ्यातील ऐवज चोरणाऱ्या संशयितास शहर पोलिसांनी अटक केली. फैजान जमीर पखाली (वय १९, रा. मुजावर प्लॉट,सांगली) असे त्याचे नाव असून सराफ बाजार परिसरास संशयास्पदरित्या फिरताना त्याला ताब्यात घेण्यात आले.
अधिक माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरी, घरफोड्यांच्या घटनांतील संशयितांवर कारवाईसाठी पथक तयार केले आहे. ११ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता कामावरून घरी चाललेल्या खाणभागातील बिरणगे गल्ली येथे महिलेच्या गळयातील गंठन हिसडा मारून चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करताना पथकास संशयित फैजानबाबत माहिती मिळाली. तो सराफ बाजार परिसरात सोने विक्रीसाठी फिरत असल्याचे समजताच पथकाने त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात चोरलेल्या गंठनाचा काही भाग, एक पदक असा सुमारे अडीच तोळे वजनाचा ऐवज मिळून आला. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक निरीक्षक निलेश बागाव यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.