मिरज : मिरजेत लग्नासाठी आलेल्या मुंबईतील पाहुण्यांचे सुमारे सहा लाख रुपये किमतीचे २३ तोळे दागिने मिरजेत बौध्द वसाहतीतून चोरीस गेले. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.डोंबिवली, मुंबई येथे राहणारे विजय श्रावण कुरणे हे त्यांचे साडू दयानंद सरवदे यांचा मुलगा मयूर याच्या लग्नासाठी शनिवारी कुटुंबीयांसह मिरजेला आले होते. मंगळवारी लग्न असल्याने विजय कुरणे, त्यांची पत्नी, मुले, दोन सुना असे सर्वजण मेहुणे प्र्रशांत कांबळे यांच्या बौद्ध वसाहतीतील घरात मुक्कामास होते. लग्नादिवशी सकाळी कार्यक्रमास जाण्यासाठी बॅगेतील दागिन्यांची पर्स काढण्यास गेल्यानंतर पर्स गायब असल्याचे दिसून आले. कुरणे कुटुंबीयांनी शोधाशोध केल्यानंतर बॅगेतील तळाशी पर्समधील एक सोन्याचे गंठण सापडले. मात्र पाटल्या, बांगड्या, अंगठ्या, मंगळसूत्र, नेकलेस, कानातील टॉप्स, रिंगा असे २३ तोळ्याचे दागिने असलेली पर्स चोरीस गेली. मेहुण्याच्या घरातून चोरी झाल्याने हवालदिल झालेल्या विजय कुरणे यांनी शहर पोलिसांत आज, गुरुवारी चोरीची फिर्याद दिली. चोरीप्रकरणी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
मिरजेत सहा लाखांच्या दागिन्यांची चोरी
By admin | Updated: December 22, 2016 00:13 IST