लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : सर्वोच्च न्यायालयात मराठा समाज आरक्षण कायदा रद्द केल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी विटा तहसीलदार कार्यालयासमोर तरुणांनी प्रातिनिधिक स्वरूपात ठिय्या आंदोलन केले. यावेळी खा. संजयकाका पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार असून या प्रश्नी लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन दिले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्याचा निकाल बुधवारी दिल्यानंतर सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याच्या निषेधार्थ गुरुवारी विटा येथे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते शंकर मोहिते, विजय पाटील, नगरसेवक दहावीर शितोळे, महेश बाबर, विकास जाधव, सुधीर बाबर, विनोद पाटील, रोहित पवार, सिद्धांत पाटील आदीसह मराठा समाजाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तहसील कार्यालयाच्या आवारात एकत्रित आले.
त्यावेळी तेथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांचे पालन करीत सामाजिक अंतर ठेवून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार संजयकाका पाटील आंदोलन स्थळी दाखल झाले. त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी खा. पाटील व तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना निवेदन दिले. खा. पाटील यांनी मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून या प्रश्नी लवकरच तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही आंदोलनकर्त्यांना दिली.