सोलापूर-रत्नागिरी महामार्गाचे काम सध्या शिराळा-कोकरूड रस्त्यावर सुरू आहे. बिळाशी येथील बसस्थानक ते वस्तीपर्यंतचा रस्ता गेल्या चार दिवसांपूर्वी पूर्ण केला आहे. रस्त्याच्या खडीचे व्यवस्थितपणे रोलिंग न झाल्यामुळेच कालच्या पावसात रस्ता वाहून जाऊन पोलीस आउटपोस्टच्या बाजूच्या घरात पाणी घुसले. नाले पाच ते सहा फूट खोल असून, ते पूर्णत: बुजलेले आहेत. सध्या नाल्यापेक्षा तीन ते चार फूट उंचीने काही ठिकाणी रस्ता चढलेला आहे. हा रस्ता खोदून तीन-चार फुटाने खाली घ्यावा, या मागणीसाठी नागरिकांनी हे काम बंद पाडले होते; परंतु रातोरात हे काम ठेकेदाराने पूर्ण केले आहे. पहिल्याच पावसात हा रस्ता वाहून गेला आणि लोकांच्या घरात पाणी घुसले. हा रस्ता व नाल्याचे काम व्यवस्थितपणे करावे, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. सध्या नाले पूर्णतः भरून गेल्यामुळे ते प्रवाहित झालेले नाहीत. ठेकेदाराने गावाकडील नाले साफसफाई करून प्रवाहित करणे गरजेचे आहे.
वाहून गेलेला रस्ता व त्याखालील खडी पूर्णत: उखडली आहे. काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्यानेच रस्ता वाहून गेल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून ठेकेदाराला रस्ता व शेजारील नाले व्यवस्थितपणे प्रवाहित करून देण्याची सूचना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फाेटाे : ०७ बिळाशी १
ओळ : बिळाशी (ता. शिराळा) येथील नुकताच तयार झालेला रस्ता पहिल्याच पावसाने वाहून गेल्यामुळे कामाच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.