शिराळा : शिराळ्यातील नागपंचमी २००२ पासून उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे, तर दोन वर्षे कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरी होत आहे. यंदा तर प्रतिकात्मक नागमूर्तीची मिरवणूकही निघणार नाही. अंबामाता मंदिर बंद असल्याने देवीचे दर्शनही होणार नाही. घरीच नागपंचमी साजरी केली जाणार आहे. मात्र संपूर्ण शहरावर ड्रोनद्वारे प्रशासनाची नजर राहणार आहे.
शिराळ्यातील नागपंचमी जिवंत नागपूजेसाठी प्रसिद्ध आहे. १९६८ मध्ये दत्ताजीराव पोटे यांच्यामुळे ज्येष्ठ उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर नागपंचमीला शिराळ्यामध्ये आले आणि किर्लोस्करांनी लेखाद्वारे ती जगभर प्रसिद्ध केली. मात्र २००२ पासून नागपंचमीवर बंधने येत गेली.
गतवर्षीपासून कोरोनाचे निर्बंध कडक झाल्यामुळे प्रतीकात्मक मूर्तीची मिरवणूक व पूजाही बंद करण्यात आली आहे. शिवाय अंबामाता मंदिर बंद असल्याने देवीचे दर्शनही घेता येणार नाही. केवळ मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत देवीची पूजा होणार आहे. महाजन यांच्या घरात मानाच्या पालखीची पूजा व आरती करून दहा मानकऱ्यांसमवेत पालखी मंदिरात नेऊन तेथे पूजा केली जाणार आहे.
चाैकट
यंत्रणा सज्ज
स्थानिक एसटी वाहतूक बंद असल्याने बसस्थानक, वाहनतळ रिकामे आहेत. घराबाहेर पडू नका, लॉकडाऊनचे नियम पाळा असे आवाहन नगरपंचायतीमार्फत केले जात आहे. शहरातील स्वच्छता, औषध फवारणी, चेकपोस्ट आदी कामे पूर्ण केली आहेत. उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशावरील एक हजार लसी उपलब्ध आहेत. पोलीस व वन विभागाच्यावतीने मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे.