जत तालुक्यातील वळसंगवरून शेड्याळ, दरिकोणूर, दरीबडची, जिल्याळ व पुढे विजापूरकडे जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. वळसंग गावाच्या हद्दीत गावालगत मोठा ओढा आहे. ओढ्यालगत दोन्ही बाजूने मोठी झाडेझुडपे वाढलेली आहेत. अनेक वर्षांपासून हा रस्ता रुंदीकरण झालेला नाही व रस्त्याच्या साइट पट्ट्यालाही आता जागा शिल्लक नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे कायम दुर्लक्ष केले आहे.
वळसंग-शेड्याळ मार्गावर वाहतूकही मोठ्या प्रमाणात असते, तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात या मार्गावर वर्दळ असते. दोन्ही बाजूंनी काटेरी झुडपे वाढल्यामुळे समोरून वाहने अचानकपणे कधी येतात, हे समजतच नाही. यामुळे छोटे-मोठे अपघात घडलेले आहेत. दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास दोन्ही वाहने क्रॉसिंग होत नाहीत. वाहने क्रॉसिंग करत असताना मोठी कसरत करावी लागते. एक वाहन अर्धा किलोमीटरपर्यंत मागे घेऊन वाहन क्रॉसिंग करावे लागत आहे. बांधकाम विभागाने हा प्रश्न कधीही गांभीर्याने घेतले नाही.
बांधकाम विभागाने परिस्थितीची पाहणी करून, त्वरित काटेरी झुडपे काढून रस्ता रुंदीकरण करावा, अन्यथा शिवसेना व ग्रामपंचायतच्या वतीने आंदोलन करू, असा इशारा शेड्याळचे सरपंच अशोक जाधव, उपसरपंच भगवानदास केंगार, ग्रामपंचायत सदस्य कर्यापा गुगवाड, रखमाजी केंगार, प्रवीण जावीर, गंगाधर बिराजदार यांनी दिला आहे.