अविनाश बाड - आटपाडीशिधापत्रिकेवर मिळणारे रॉकेल शासनाच्या पुरवठा विभागाने कमी करत करत आता माणसी दोन लिटरवरुन २00 मिलिलिटरवर आणले आहे. जानेवारी महिन्यात तर लोकांना रॉकेलचा एक थेंबही मिळाला नाही. ग्रामीण भागात रॉकेलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐन परीक्षांच्या हंगामात गोरगरिबांच्या झोपडीतला दिवा विझू लागला आहे. खेड्यापाड्यात आता अंत्यविधीसाठीसुध्दा रॉकेल मिळेनासे झाले आहे.रॉकेलसाठी आता फक्त रेशनचा एकच पर्याय लोकांसमोर असताना, शासनाने वारंवार कपातीचे धोरण अवलंबून सर्वसामान्य माणसांचे जगणे कठीण केले आहे. १0-१२ वर्षांपूर्वी फ्री सेल केरोसीन विक्रीचे परवाने बंद करुन रेशनच्या दुकानासमोरच्या रांगा वाढविल्या. आता त्यात वारंवार कपात करुन शासनाने लोकांचे हाल सुरु केले आहेत. रॉकेलचा उपयोग स्वयंपाकासाठी करणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. ग्रामीण भागातही आता स्वयंपाकासाठी लाकडे मिळणे कठीण झाले आहे.खेड्यांसह वाड्या-वस्त्यांवरील अनेक कुटुंबांपर्यंत अद्याप वीज न पोहोचल्याने आजही अनेक घरांमध्ये कंदिलाच्या उजेडात अभ्यास करुन मुले-मुली भविष्याची स्वप्ने साकार करण्यासाठी धडपडत आहेत.आटपाडी तालुक्यात ३0 हजार ९९२ शिधापत्रिका असणारी कुटुंबे आहेत. त्यांना माणसी २ लिटरप्रमाणे रॉकेल देण्यासाठी २ लाख ४३ हजार ४१0 लिटर रॉकेलची मागणी तालुका पातळीवरुन केली जाते. प्रत्यक्षात आॅक्टोबर ते डिसेंबर २0१४ या कालावधित ८४ हजार लिटर रॉकेल आटपाडी तालुक्याला एका महिन्यासाठी देण्यात आले, तर आता जानेवारी महिन्यासाठी फक्त ४८ हजार लिटर रॉकेल पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत. हे रॉकेलही ३0 व ३१ जानेवारीला रेशन दुकानदारांना पोहोच करण्यात आले नाही. त्यामुळे महिनाभर रॉकेलसाठी हेलपाटे मारणाऱ्या ग्रामस्थांनी रांगा केल्या. त्यानंतर लिटरऐवजी गोडेतेलाच्या १00-२00 मि.लि.च्या मापाने रॉकेलचे वाटप होताना ग्रामस्थांनी पाहिले. प्लॅस्टिकच्या कॅनच्या तळाशी थोडेसे आलेले हे रॉकेल हलवत रेशन दुकानदारांशी हुज्जत घालणारे ग्रामस्थ पहावयास मिळत आहेत.
आटपाडी तालुक्यात रॉकेलची टंचाई
By admin | Updated: February 9, 2015 01:14 IST