दिघंची : दिघंची (ता. आटपाडी) येथील बसस्थानकानजीक संजय मशिनरी स्टोअर्स दुकानातून चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
रामचंद्रदादा जरे व त्यांचा मुलगा सुभाष (रा. खवासपूर, ता सांगोला) हे दोघे सोमवारी रात्री नऊच्यादरम्यान दुकान बंद करून घरी गेले. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता दुकान उघडले असता, दुकानाच्या पश्चिम बाजूच्या भिंतीला भगदाड पाडल्याचे दिसून आले. यानंतर दुकानातील साहित्याची तपासणी केली असता, गेजची फायबर व जुनी ५० किलो कोटिंगची तांब्याची तार व ३० किलो बुशिंग असा एकूण ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. रामचंद्रदादा जरे यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिघंचीत दुकान व घरफोडीच्या घटनांत वाढ झाली असून, संजय मशिनरी हे बसस्थानकाजवळच असणारे दुकान फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.