मिरज : मिरज तालुक्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत न जाता ग्रामपंचायत कार्यालयात बसूनच बोगस करण्यात आल्याची तक्रार सदस्यांनी केली. पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कवलापूर येथील ग्रामस्थांचा विरोध असलेला विश्वपार्वती पोल्ट्री फार्म बंद करण्याच्या मागणीचा ठरावही करण्यात आला.मिरज पंचायत समितीची मासिक सभा सभापती दिलीप बुरसे यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती तृप्ती पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्या उपस्थितीत पार पडली. अवकाळी पावसाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीच्या चुकीच्या पंचनाम्यांबाबत सतीश नीळकंठ यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारला. मार्च महिन्यात सलग तीन वेळा अवकाळी पावसाने झोडपून काढले. पावसामुळे द्राक्ष, बेदाणा व ज्वारी, हरभरा, गहू, हळद या कोरडवाहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचे शेतीच्या बांधापर्यंत जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश असतानाही, स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र ग्रामपंचायत कार्यालयात बसून बोगस पंचनामे केले. द्राक्ष व बेदाणा नुकसानीला प्राधान्य दिले. तेही पंचनामे वस्तुनिष्ट नाहीत. द्राक्ष व बेदाण्यासोबत कोरडवाहू शेतीपिकांच्या नुकसानीलाही प्राधान्य देण्याची गरज होती. कोरडवाहू शेतीतील ज्वारी, कडबा, हरभरा, गहू व हळद या पिकांचेही या अवकाळीने ५० टक्क्यापेक्षा जादा नुकसान झाले असताना, अधिकाऱ्यांनी या पिकांच्या वस्तुनिष्ठ नुकसानीकडे दुर्लक्ष केल्याची सदस्यांनी तक्रार केली. आतापर्यंत केवळ द्राक्ष व बेदाणा यापलीकडे इतर कोणतीच पिके नुकसान भरपाईत जमा न धरण्याच्या अधिकाऱ्यांच्या धोरणामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे. अधिकाऱ्यांनी कोणत्याच पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे न केल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहात असल्याचे सदस्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तानंग प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या तांत्रिक दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार सुभाष पाटील यांनी केली. उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यास पाटील यांनी रोखून धरले. कवलापूर येथील विश्वपार्वती पोल्ट्रीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तक्रारी असलेली ही पोल्ट्री बंद करावी, अशी मागणी सतीश नीळकंठ यांनी केली. या मागणीची दखल घेऊन सभापतींनी तसा ठराव करण्याची सूचना केली. सभापती बुरसे व आरोग्य अधिकारी मधू पाटील यांनी पोल्ट्री बंद करण्याबाबत जि. प.कडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. नरवाड येथील भारत निर्माणच्या जुन्या पाणी पुरवठा समितीचे बँक खाते बंद करावे, तसेच एरंडोली पाणी योजनेसाठी विनापरवाना रस्ता खुदाईच्या चौकशीची मागणी बाबासाहेब कांबळे यांनी केली. रस्त्याचे प्रश्न शंकर पाटील, आबासाहेब चव्हाण यांनी मांडले. (वार्ताहर)‘म्हैसाळ’च्या पाण्याचा विसरम्हैसाळ योजना बंद असल्याने मिरज पूर्व भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंचायत समितीच्या सभेत ‘म्हैसाळ’चे पाणी सुरू करण्याच्या मागणीवर सदस्य आक्रमक होतील अशी अपेक्षा होती. मात्र सभेत एकाही सदस्याने पाण्याचा प्रश्न उपस्थित केला नाही.अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तानंग प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या तांत्रिक दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार सुभाष पाटील यांनी केली. यावेळी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यास त्यांनी रोखले.
अवकाळीमुळे नुकसानीचे पंचनामे बोगस
By admin | Updated: April 7, 2015 01:19 IST