मिरज : मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या कामाचा ऑनलाईन प्रारंभ दि. २५ सप्टेंबर रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. रस्ता काम सुरु होणार असल्याने प्रसिद्धीसाठी आ. सुरेश खाडे यांच्या प्रतिमेवर चिखलफेक केल्याची टीका भाजप मिरज शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर यांनी केली. पुन्हा असे कृत्य केल्यास भाजप कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील असा इशाराही आळतेकर यांनी दिला.
आळतेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यांसह शहरातील अनेक रस्ते पावसाने खराब झाले आहेत. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने रस्ते खराब होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी आ. खाडे यांनी २७ कोटी ५६ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करून आणला. रस्त्याची निविदा प्रक्रिया होऊन ठेकेदारही निश्चित झाले आहेत. या कामाचा अधिकृत प्रारंभ केंद्रिय मंत्री नितीन गडकरी दि. २५ सप्टेंबर रोजी करणार आहेत. रस्त्याचे काम सुरु होत असल्याचे माहित असल्याने चमकोगिरी करणाऱ्या विरोधकांनी आ. खाडे यांच्या प्रतिमेवर चिखलफेक केली. राज्यात व महापालिकेत सत्त्ता असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील कोणता प्रश्न तडीस नेला आहे, हे सांगावे. शहरातील खराब रस्त्यांना केवळ आमदारांना जबाबदार ठरविणे, बालिशपणा आहे. चमकोगिरी करणाऱ्यांची पात्रता मिरजकर नागरिक ओळखून आहेत. यापुढे पुन्हा असे कृत्य केल्यास भाजप कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील असा इशाराही आळतेकर यांनी दिला आहे.