तासगाव : शिवसेनेचे माजी तासगाव तालुकाप्रमुख अमोल काळे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांनी मुंबई येथे राज ठाकरे यांची भेट घेतली. काळे यांच्या मनसे प्रवेशाबाबत ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत हा मनसे प्रवेश करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
अमोल काळे यांनी शिवसेनेत चार वर्षे युवा सेना तासगाव तालुकाप्रमुख म्हणून काम केले होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना सेनेचे तासगाव तालुकाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. सुमारे सव्वादोन वर्षे त्यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली. मात्र, नुकतेच तासगाव तालुका शिवसेनेत पदाधिकारी बदल झाले. या बदलात अमोल काळे यांना डावलण्यात आहे. निवडीच्या प्रक्रियेत त्यांना कुठेही विचारात घेतले नाही. शिवाय तालुकाप्रमुख पदावरूनही त्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. त्यामुळे नाराज काळे मनसेत शेकडो युवकांना घेऊन मुंबई येथे मनसेत प्रवेश करणार आहेत.