विटा-मायणी रस्त्यावरील चिरवळ ओढयावर पुलाचे निकृष्ट काम झाल्याने व येथील खड्ड्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी ट्रक अडकल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कारभाराविरोधात टीका केली होती. त्यानंतर सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे रस्ता कामाचा प्रश्न चांगलाच तापला होता.
मंगळवारी सुहास बाबर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पुलावर आंदोलन करून रस्ता रोखून धरला. त्यामुळे सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली. यावेळी आंदोलकांनी नगरपालिका प्रशासन व सत्ताधारी मंडळी जनतेच्या पैशांची लूट करत आहेत. आमदार अनिल बाबर यांनी रस्त्यासाठी आणलेल्या निधीचा योग्य वापर करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप करत नगरपालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. त्यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील हे आंदोलनस्थळी आले. त्यावेळी आंदोलकांनी त्यांना धारेवर धरत गलथान कारभाराचा निषेध केला. सुमारे दोन तास आंदोलन सुरू राहिल्याने विटा शहरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले.
यावेळी नगरसेवक अमर शितोळे, समीर कदम, संजय भिंगारदेवे, राजू जाधव, ॲड. विनोद गोसावी, विजय सपकाळ, सीताराम बुचडे, रामचंद्र भिंगारदेवे, माधवराव कदम, मुकुंद लकडे, रणजित पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
राष्ट्रीय महामार्गावर माती टाकणे योग्य नाही. विट्यातील रस्त्यांसाठी अनिल बाबर यांनी १२ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. एवढा निधी आणून ही रस्त्यांची अवस्था वाईट असेल तर एवढी भ्रष्टाचारी नगरपालिका देशात दुसरी नसेल. आमदारांनी आणलेल्या निधीचे श्रेय त्यांना मिळू नये म्हणून सत्ताधारी मंडळी निधी नाकारत आहेत आणि त्या निधीतून सुचविलेली कामे निकृष्ट पद्धतीने करत असल्याचा आरोप सुहास बाबर यांनी केला.
फोटो ओळी : विटा नगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात मंगळवारी शिवसेना आक्रमक झाली. जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली मायणी रस्त्यावरील ओढ्यावर आंदोलन करत शिवसैनिकांनी रस्ता रोखून धरला.