शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात चारशे कोटींवर झालेली विकासकामे पाहता, २०१९ च्या विधानसभेची दहीहंडी आमदार शिवाजीराव नाईकच फोडणार, असा विश्वास यशवंत युवक संघटनेचे अध्यक्ष सत्यजित नाईक यांनी व्यक्त केला.मानखुर्द (मुंबई) येथे संघर्ष प्रतिष्ठान व शिवसह्याद्री ग्रुप यांच्यातर्फे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी. आर. जाधव अध्यक्षस्थानी होते.यावेळी सत्यजित नाईक म्हणाले, शिराळा पश्चिम भागात रस्ते, वीज, आरोग्य यासह इतर मूलभूत सुविधांसाठी, त्याचबरोबर भाजप सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून शिवाजीराव नाईक यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी तालुक्यात आणला आहे. यामुळे २०१९ ची दहीहंडी आमदार शिवाजीराव नाईकच फोडणार, हे निश्चित आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील बहुतांशी मतदार मुंबईला आहेत. त्यांना आजवर अनेक सोयी-सुविधा शासनाच्या विविध योजनांतून पुरविल्या आहेत. या दोन्ही मंडळांच्या माध्यमातून युवकांची संघटित ताकद सामाजिक कार्यासाठी उभी करून लोकांचे प्रश्न सोडवावेत.यावेळी डी. आर. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. दहीहंडी विजेत्या संघास मान्यवरांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमास सचिन नाचणकर, दीपक गुरव, जालिंदर गलुगडे, राजेंद्र नेर्लेकर यांच्यासह मानखुर्दमधील युवक व मुंबईस्थित नागरिक उपस्थित होते.
शिराळा विधानसभेची दहीहंडी शिवाजीराव नाईकच फोडणार: सत्यजित नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:57 IST