शिराळा : येथील उपजिल्हा रुग्णालय व कोकरूड ग्रामीण रुग्णालयात पहिल्या दिवशी बाह्यरुग्ण तपासणी सुरू झाली असून पहिल्या दिवशी ४९ बाह्यरुग्ण तपासणी केली. ही सेवा सुरू करण्याबाबत आदेश तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिला होता.
पहिल्या दिवशी शिराळा येथे ४७ तर कोकरूड येथे २ बाह्यरुग्ण तपासणी केली. कोविड रुग्णालय सुरू झाल्यापासून या दोन्ही रुग्णालयांत बाह्यरुग्ण तपासणी बंद होती. यामुळे कोरोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांना उपचार मिळत नव्हते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ही माहिती व तक्रारी मिळाल्यावर त्यांनी ही सेवा सुरू करण्याबाबत सूचना केल्या होत्या.
शनिवारी उपजिल्हा रुग्णालयात १०० ऑक्सिजन बेड कार्यान्वित केले आहेत. याचबरोबर कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना त्यांच्या रुग्णाबाबत उपचार व परिस्थितीबाबत माहिती मिळावी, यासाठी नागरिकांसाठी मदत कक्ष सुरू केला आहे. सर्व प्रकारच्या चाचण्या, तपासण्यांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू झाला आहे. उपजिल्हा रुग्णालयात १७ वैद्यकीय अधिकारी, इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजनही केले आहे. रुग्णालयामध्ये फेव्हर क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.