सांगली : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी शनिवारी महापालिकेतील नगरसेवक शेखर माने यांनी कॉँग्रेसतर्फे व अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. माने यांच्या उमेदवारी अर्जामुळे कॉँग्रेसमध्ये गटबाजीला उधाण आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशाल पाटील समर्थक असलेल्या माने यांच्या उमेदवारीमुळे कॉँग्रेसपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी विविध पक्षातील नगरसेवक उपस्थित असल्याने तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. शनिवारी नगरसेवक शेखर माने यांनी अर्ज दाखल केला. यावेळी उपमहापौर विजय घाडगे, गौतम पवार, उमेश पाटील, जतचे सुरेश शिंदे, मन्सूर खतीब, नगरसेवक गजानन मगदूम, संगीता खोत, अनारकली कुरणे, अश्विनी खंडागळे आदी उपस्थित होते. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख बुधवार, २ नोव्हेंबर असून, अर्जांची छाननी गुरुवार, दि. ३ नोव्हेंबरला, तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख शनिवार, दि. ५ नोव्हेंबर आहे. मतदान शनिवार, दि. १९ नोव्हेंबरला होणार आहे. (प्रतिनिधी)
विधानपरिषद निवडणुकीसाठी शेखर मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Updated: October 30, 2016 00:50 IST