इस्लामपूर : इस्लामपूर-वाळवा रस्त्यावरील दंडभाग शेतातील लिंबाच्या झाडास अनिल नाना वडार (वय ५१, रा. वडार गल्ली, इस्लामपूर) याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेत आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिट्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. या चिठ्ठीत अनिल वडार याने कुटुंबाकडून पैशांसाठी होत असलेल्या छळातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे निष्पन्न होत असल्याची माहीती तपास अधिकारी सहायक उपनिरीक्षक बळीराम घुले यांनी दिली.
अनिल वडार याचे एका महिलेसोबत गेल्या २५ वर्षांपासून संबंध होते. तो बाहेरगावी काम करत होता. त्याच्याकडून महिलेस पैसे मिळत होते. पैसे मिळणे बंद झाल्याने या महिलेसह तिची दोन मुले, मुलगी आणि जावई यांनी अनिलच्या घरातील सर्व साहित्य उचलून आणले होते. त्यामुळे तो निराश झाला होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. बळीराम घुले अधिक तपास करत आहेत.