कवठेएकंद : ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांच्या मातोश्री भागीरथी रामचंद्र गुरव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त तासगाव येथील परिवर्तन परिक्रमा संस्थेच्यावतीने पहिला ‘ज्ञानभागीरथी’ पुरस्कार शैला दाभोलकर यांना आज (शुक्रवारी) प्रदान करण्यात आला. अंधश्रध्दा निर्मूलनाच्या चळवळीतून समाजात विधायक बदल घडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याबद्दल दाभोलकर यांना हा पुरस्कार कवठेएकंद (ता. तासगाव) येथील क्रांतिसिंह नाना पाटील ज्ञानप्रबोधिनीमध्ये कॅ. राम लाड व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख १० हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.परिवर्तन परिक्रमा संस्थेतर्फे यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्ती तसेच विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. पुरस्काराला उत्तर देताना शैला दाभोलकर म्हणाल्या की, चांगल्या विचारातून कृती झाल्यानंतरच समाजसुधारणेसाठीचे पाऊल पुढे पडते. ते विधायक परिवर्तनासाठी सहाय्यभूत ठरणारी गोष्ट आहे. पहिला ‘ज्ञानभागीरथी’ पुरस्कार या मातीतून आणि विचारातून मला मिळाला आहे, ही माझ्यादृष्टीने अत्यंत गौरवाची बाब आहे. भागीरथी गुरव यांच्या कार्याविषयी त्यांनी यावेळी गौरवोद्गार काढले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव यांनी स्वागत केले. आपल्या मातोश्री भागीरथी गुरव यांची, मुलांनी कोणत्याही परिस्थितीत शिक्षणाची कास सोडता कामा नये, अशी तळमळ होती. त्याच विचाराच्या समाजातील गरीब, होतकरू, गुणवंत विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप मिळावी म्हणून त्यांचा गौरव करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शाहीर शीतल साठे यांनी आईची महती सांगणारी गीते सादर केली. जी. पी. (काका) पाटील, अॅड. मुक्ता दाभोलकर, हौसाताई पाटील यांचीही भाषणे झाली. माजी आमदार हाफिज धत्तुरे, विजय कराडे, प्रा. बाबूराव लगारे, बाळासाहेब गुरव, प्राचार्य गोरख पवार, अनिल म्हमाणे, जंबूभाऊ शिरोटे, राजाराम माळी, प्रा. एन. डी. कदम आदी उपस्थित होते. फारूक गवंडी यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. विवेक गुरव यांनी आभार मानले. (वार्ताहर)
शैला दाभोलकर यांना ‘ज्ञानभागीरथी’ पुरस्कार प्रदान
By admin | Updated: June 28, 2014 00:43 IST