लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : येळापूर (ता. शिराळा) येथे मे महिन्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून, एक एक घागर पाण्यासाठी लोकांना दिवसभर ताटकळत रहावे लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी पसरली आहे.
येळापूरसाठी कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही. मराठी शाळेच्या आवारात असलेली सार्वजनिक कूपनलिका हा पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे. मुबलक पाणी असणाऱ्या या कूपनलिकेतून गेली दोन वर्षे पिवळसर पाणी येत होते. याबाबत ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी तक्रार करूनही दखल न घेतल्याने एक महिन्यापूर्वी गावातील महिलांनी याबाबत आमदार मानसिंगराव नाईक व शिराळा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे तक्रार केल्यानंतर या कूपनलिकेची स्वच्छता करून हा प्रश्न सुटला होता. मात्र मुबलक प्रमाणात असणाऱ्या या कूपनलिकेचे पाणी मे महिन्याच्या सुरुवातीलाच कमी कमी होत जाऊन नाहीसे झाले आहे.
सद्या एका तासाला एक घागर पाणी मिळत आहे. यामुळे तासभर बोअर शेजारी उभे रहावे लागत असून, लोकांचा संपूर्ण वेळ पाणी भरण्यासाठी जात आहे. खरीप हंगामाच्या मशागती सुरू असून, धूळ वाफेची पेरणी होणार असल्याने शेतकऱ्यांची लगबग सुूरू असताना अचानक पिण्याच्या पाण्याचे नवे संकट उभे ठाकले आहे.
कोट
महिलांनी कूपनलिकेतून येणाऱ्या दूषित पाण्याबद्दल आवाज उठविल्याने त्याची स्वच्छता होऊन प्रश्न सुटला होता. मात्र पंधरा दिवसांपूर्वी अचानक येथील बोअरचे पाणी गेल्याने पिण्याच्या आणि खर्चाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला एका एका कळशीसाठी दिवस घालवावा लागत आहे.
- रेश्मा पाटील