मिरज : मिरजेतील किल्ला भाग येथे एका अपार्टमेंटचे बांधकाम सुरु असताना तटभिंत कोसळल्याने सात कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. पाच जण जखमी झाले.मृत कामगाराचे नाव अद्याप समजू शकले नाही. भिमाप्पा मेकळगी हे गंभीर आहेत. तर केदार निंगनुर, सहदेव मदार, रायप्पा, बिराप्पा करगणी व मुत्याप्पा माटेकर अशी जखमींची नावे आहेत. किल्ला भागात कासीम मणेर यांच्या मालकीच्या खुशी वन या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे तळघराच्या भोवती तटभिंतीचे बांधकाम सुरू असताना दुपारी एक वाजता सुमारे पाच फुटाची सिमेंट विटांची तटभिंत मजुरांच्या अंगावर कोसळली. ढिगार्याखाली सापडलेल्या सात कामगारांना तातडीने बाहेर काढून मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सुमारे ३५ वर्षे वयाच्या एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. काम करणारे सर्व मजूर कर्नाटक सीमाभागातील आहेत. त्याना ठेकेदाराने बांधकामासाठी आणले होते. कोणत्याही सुरक्षा साधनाशिवाय हे मजूर काम करीत होते. गंभीर जखमी भीमाप्पा मेकळगी यास खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर बांधकाम ठेकेदाराने पलायन केले असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.
Sangli: मिरजेत तटभिंत कोसळून सात कामगार ढिगाऱ्याखाली दबले; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:56 IST