सचिन लाड ल्ल सांगलीगेल्या दोन-तीन वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय सेवेतील लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पकडण्याची जोरदार मोहीम सुरू ठेवली आहे. या मोहिमेत पोलीसच ‘हिट लिस्ट’वर असल्याचे आतापर्यंतच्या झालेल्या कारवाईतून दिसून येते. सात अधिकाऱ्यांसह १७ पोलीस लाच घेताना जाळ्यात सापडल्याने, पोलीस दलाच्यादृष्टीने ‘लाचखोरी’ हा चिंतेचा विषय बनला आहे. महिन्यातून किमान एक तरी पोलीस सापडत आहे. तरीही लाचखोरीचे ग्रहण सुटेनासे झाले आहे.यापूर्वी पोलीस शिपाई, हवालदार लाच घेताना सापडण्याचे प्रमाण नगण्य होते. मात्र आता वरिष्ठ अधिकारीही सापडू लागल्याने पोलीस दलाच्या प्रतिमेला तडे जाऊ लागले आहेत. ‘चिरीमिरी’साठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून नोकरी धोक्यात टाकली जात आहे. महिन्या-दीड महिन्यातून एखादा तरी ‘खाकी’ वर्दीतील सेवक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अलगद सापडत आहे. ते पोलीस ठाण्याच्या आवारातच लाच घेताना सापडत आहेत. पोलीस दलाची प्रतिमा सुधारण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्या सुरु असलेल्या प्रयत्नाला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या करामतींमुळे बदनामीचा डाग लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना ‘चिरीमिरी’साठी त्रास देण्याचा उद्योगही काही पोलिसांकडून सुरू आहे. एखाद्या प्रकरणात काहीही संबंध नसताना कोणालाही ताब्यात घेऊन त्याला त्रास दिला जातो. यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्याकडे पैशाची मागणी केली जात आहे.जिल्हा पोलीसप्रमुख सावंत यांना दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. त्यांनी सावकारी मोडीत काढली. गुन्हेगारी मोडीत काढली. अवैध धंदेही बंद केले. चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर नेहमीच शाबासकीची थाप मारली. सेनापती खंबीरपणे पाठीशी असतानाही, काही मोजक्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाचखोरीचा आजार जडल्याचे दिसून येते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अधिकारी सापडल्यानंतर पोलीस दलातील लाचखोरी चव्हाट्यावर आली होती. कायद्याचे व जनतेचे रक्षकच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू लागल्याने, सर्वसामान्यांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन वर्षात सतरा पोलीस जाळ्यात!
By admin | Updated: July 4, 2014 00:47 IST