लाेकमत न्यूज नेटवर्क
मिरज : बँकेकडून दीड कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने मिरजेतील रमेश वीरभद्र किवटे (रा. नदीवेस, मिरज) या सराफास ४० लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या मिथुल कन्नूभाई त्रिवेदी (रा. औंध, जि. पुणे) या संशयिताकडून मिरज शहर पोलिसांनी सात लाख साठ हजार रुपये जप्त केले. जप्त केलेली रक्कम सराफ किवटे यांना परत देण्यात आली. कर सल्लागार सचिन व्यंकटेश देशपांडे (वय ५२, रा. शिवाजीनगर, मिरज) यास पाेलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
मिरजेतील सराफ रमेश किवटे यांना दीड कोटीचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगून मिरजेतील कर सल्लागार सचिन देशपांडे, अजय पवार ऊर्फ अभिषेक भंडारे, त्याची पत्नी प्रियांका शेट्टी (दोघे रा. मेंगलोर) व मिथुल त्रिवेदी यांनी ४० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याबद्दल शहर पोलिसांत सहा महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश किवटे यांना व्यवसायासाठी एक कोटी रुपये कर्जाची गरज हाेती. कर सल्लागार सचिन देशपांडे यांनी त्यांना बँकेकडून दीड कोटी रुपये कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखविले. किवटे यांना बँक मॅनेजर असल्याचे सांगणाऱ्या अजय पवार नामक व्यक्तीस भेटविले. सचिन देशपांडे याच्यासह अन्य तिघांनी बँकेचे कर्ज मंजूर झाल्याचे खोटे एसएमएस किवटे यांच्या मोबाइलवर पाठविले. मार्च २०१८ पासून दोन वर्षांत कर्ज मंजुरीसाठी प्रोसेसिंग फी, डिपाॅझिट, तारण खर्च, असे ३९ लाख ८३ हजार रुपये किवटे यांनी देशपांडे, पवार, त्रिवेदी व पवार याची पत्नी प्रियांका शेट्टी यांच्या बँक खात्यावर भरले हाेते. पैसे देऊनही कर्ज मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दिली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी मिथुल त्रिवेदी, सचिन देशपांडे या दोघांना अटक केली. यापैकी त्रिवेदी याने किवटे यांच्याकडून घेतलेले सात लाख साठ हजार रुपये पाेलिसांनी हस्तगत केले. न्यायालयाच्या आदेशाने ही रक्कम फिर्यादी किवटे यांना परत करण्यात आली. या प्रकरणातील अजय पवार व त्याची पत्नी प्रियांका अद्याप फरार आहेत.