आळसंद-विटा येथील विराज शुगरच्या चालू गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन शुक्रवारी प्रशांत सावंत व उत्तम पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकारी संचालक वैभव पाटील, विशाल पाटील, साहील देवकर उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा येथील विराज केन्स कारखान्यात गेल्या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाचा प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी दिली.
विराज केन्स एनर्जी कारखान्याच्या सन २०२१-२०२२ या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन शुक्रवारी माजी सरपंच प्रशांत सावंत व संचालक उत्तम पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी माजी आमदार पाटील बोलत होते. यावेळी कार्यकारी संचालक वैभव पाटील, व्यवस्थापकीय संचालक संग्राम देशमुख, संचालक विशाल पाटील उपस्थित होते.
कार्यकारी संचालक वैभव पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या उसाचे करेक्ट वजन आणि योग्य भाव देण्यासाठी विराज शुगर यापुढेही अग्रेसर राहील. उसाचा दुसरा हप्ता २०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांना अदा करण्यात आला असून, दुसऱ्या हप्त्यापोटी २ कोटी ५० लाख रुपये रक्कम वर्ग करण्यात आली. तिसरा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना देण्यात येईल. चालू वर्षीचा गळीत हंगाम दि.१३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.
व्यवस्थापकीय संचालक संग्राम देशमुख यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास संचालक उत्तम पाटणकर, गोविंदराव भोसले, अशोक मोरे, राजेंद्र माने, साहील देवकर, सरव्यवस्थापक विजय कुलकर्णी, शेती अधिकारी रमेश शिंदे, दीपक जांभळे, चीफ केमिस्ट दीपक पाटील, गट अधिकारी अंकुश मंडले, हैदर शिकलगार, राहुल घोरपडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.