इस्लामपूर : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या सर्व युनिटकडे सन २०२०-२१मध्ये गळीतास आलेल्या ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन रुपये २५०प्रमाणे देण्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. दि. ९ जून रोजी ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाईल, अशी माहिती अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्यात संपलेल्या गळीत हंगामात १८ लाख ५४ हजार ७१० टन ऊसाचे गाळप केले आहे. गेल्यावर्षी कोरोनासह अनेक संकटांना सामोरे जावे लागले. यामध्ये साखराळे युनिटमध्ये ९ लाख ४७ हजार ९८ टन, वाटेगाव-सुरुलमध्ये ५ लाख २३ हजार ९५८ टन, तर कारंदवाडी युनिटमध्ये ३ लाख ८३ हजार ६५४ टन गाळप केलेले आहे.
पाटील म्हणाले, या गळीत हंगामात कारखान्याकडे गळीतास आलेल्या ऊसाला पहिला हप्ता प्रतिटन २,५०० रुपये दिलेले आहेत. ही रक्कम ४६३ कोटी ६८ लाख इतकी आहे. सध्या कारखान्याकडे गेल्यावर्षी गाळपास आलेल्या ऊसाचा दुसरा हप्ता प्रतिटन २५० रुपये देत आहोत. ही रक्कम ४६ कोटी ३७ लाख होते. सध्या शेतीची मशागत, बी-बियाणे, खते आदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. त्यासाठी हा दुसरा हप्ता देत आहोत.
यावेळी उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, दिलीपराव पाटील, एल. बी. माळी, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, मुख्य लेखापाल अमोल पाटील उपस्थित होते.
चौकट
येत्या गळीत हंगामात साखराळे, वाटेगाव-सुरुल, कारंदवाडी, तिप्पेहळ्ळी (जत) या चार युनिटमध्ये २६ लाख ५० हजार ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये साखराळे युनिटमध्ये ११ लाख ५० हजार टन, वाटेगाव-सुरुल युनिटमध्ये ६ लाख ५० हजार टन, कारंदवाडी युनिटमध्ये ५ लाख टन तर तिप्पेहळळी (जत) युनिटमध्ये ३ लाख ५० हजार टन गाळप केले जाणार आहे, असे पाटील म्हणाले.
फोटो-
पी. आर. पाटील