वाळवा : हुतात्मा साखर कारखान्यास २०२०-२१ या गळीत हंगामात गाळपाला आलेल्या शेतकऱ्यांच्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन २५० रुपयांप्रमाणे सोमवारी देण्यात आला आहे. यापूर्वी प्रतिटन २५०० रुपये दिले आहेत, अशी माहिती अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नायकवडी म्हणाले, गत हंगामात पाच लाख, ५५ हजार ५८८ टन उसाचे गाळप कारखान्याने केले. तर, १२.१८ टक्के सरासरी उतारा आहे. त्याचा दुसरा हप्ता २५० रुपये याप्रमाणे १३ कोटी ८८ लाख ३२ हजार ६१४ रुपये संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले आहेत. १९८४ पासून आजअखेर ऊसदराची परंपरा जोपासली आहे. जगभरात मार्च २०२० पासून साखर विक्री, डिस्टलरी उत्पादन विक्री ठप्प झाली आहे. आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. यावर मात करून दुसरा हप्ता दिला आहे.
यावेळी उपाध्यक्ष बाबुराव बोरगावकर, संचालक शिवाजी अहिर, डॉ. संताजी घोरपडे, अण्णा मगदूम, हेमंत कदम, मारुती पाटील, विनायक पाटील, संदीप पाटील, चंद्रकांत पाटील, विलास बाड, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने उपस्थित होते.