सांगली : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या विलिंग्डन महाविद्यालयात १८ ते २२ नोव्हेंबरदरम्यान विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अर्थसहाय्यातून ‘डीएसटी इन्सापायर कॅम्प’चे (विज्ञान योग) आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पंडित, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. या शिबिरामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या शास्त्र विभागात शिकणारे व एसएससीमध्ये ९३.२ टक्क्याहून अधिक गुण मिळवणारे १६० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांना देशभरातील नामवंत संस्था व विद्यापीठातील तज्ज्ञ व शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. महाविद्यालयातील प्रयोगशाळेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, संगणक या विषयावरील विविध प्रात्यक्षिके विद्यार्थी सादर करणार आहेत.या कार्यक्रमासाठी तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ९ लाख ७५ हजाराचे अनुदान प्राप्त झाले आहे. या शिबिराचे उद्घाटन १८ रोजी सकाळी १० वाजता बीजभाषक विज्ञान लेखिका डॉ. माधवी ठाकूर देसाई यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. यावेळी किरण शाळीग्राम, डॉ. ए. बी. भिडे आदी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेचा समारोप प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांच्याहस्ते करण्यात येणार असून, यावेळी सागर फडके उपस्थित राहणार आहेत. या पाच दिवसांमध्ये अरुण चौगुले, डॉ. आर. एम. पावले, प्रा. शिवप्रसाद पाटील, डॉ. व्ही. व्ही. चाबूकस्वार, प्रा. शंकर पाटील, प्रा. प्रकाश वडगावकर, श्रीपाद गर्गे, एस. जी. गुप्ता आदींची व्याख्याने होणार आहेत. व्याख्याने सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
विलिंग्डन महाविद्यालयात उद्यापासून ‘विज्ञान योग’
By admin | Updated: November 16, 2014 23:51 IST