सांगली : शालेय दप्तरामध्ये आता मास्क आणि सॅनिटायझरचा समावेशही अपरिहार्य झाला आहे. कोरोनाविषयक काळजी घेताना शाळांनी या दोहोंचा वापर सक्तीचा केल्याने लहान मुलांसाठीच्या मास्कची मागणीही वाढली आहे.
शहरात काही शाळांच्या परिसरातील टपऱ्या, स्टेशनरी दुकानांमध्ये चॉकलेट, स्टेशनरीसोबत मास्कची विक्रीही सुरू झाल्याचे दिसत आहे. मास्क घातला असेल तरच शाळेत प्रवेश दिला जात आहे, त्यामुळे सकाळी शाळेला जाताना मुले आईलाच बॅगेत मास्क ठेवण्याची आठवण करत आहेत. शाळेच्या नव्या खरेदीत गणवेशामध्ये मास्कचाही समावेश झाला आहे. मुलांकडून मास्क अस्वच्छ होण्याचे प्रमाण पाहता प्रत्येकासाठी दोन-दोन मास्कची तजवीज पालकांनी केल्याचे दिसते. सोबत बॅगेत सॅनिटायझरची छोटीशी बाटलीही दिली जात आहे. शाळेतही हातावर मास्क देऊनच वर्गात सोडले जात आहे. मैदानावर एकत्र येऊन खेळण्यावर निर्बंध घातल्याने मुलांचा परस्पर संपर्कही कमी झाला आहे, शिवाय वस्तूंची देवाण-घेवाण, एकाच बेंचवर दोघे बसण्यावरही निर्बंध आहेत.
चौकट
पुरेशी खबरदारी घेण्याने शाळा सुरू झाल्यापासून आजअखेर एकही विद्यार्थी कोरोनाबाधित झालेला नाही. यामुळे पालकांचा आत्मविश्वासही बळावला असून पाल्याला वर्गात पाठविण्याची मानसिकता तयार झाली आहे. त्याची फलनिष्पत्ती वर्गातील संख्या वाढण्यात झाली आहे. सर्रास शाळांतील उपस्थिती ९० टक्क्यांवर गेली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी केलेल्या तपासणीत सहा शिक्षक कोरोनाबाधित आढळले होते, त्यामुळे त्यांच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यादेखील आता सुरू झाल्या आहेत.
कोट
मुले म्हणतात, घुसमट होतेय...
सतत मास्क वापरण्याने घुसमटल्यासारखे होते. वर्गात पंखा नसल्याने घामही येतो; पण मास्क काढल्यास सर रागावतात, त्यामुळे तो काढत नाही. शाळेत येताना दोन मास्क घेऊन येतो, एक घाण झाल्यास दुसरा वापरतो.
-- विदिशा साने, विद्यार्थिनी, सांगली
कोरोनामुळे मास्कची सवय झाली आहे; पण मास्कमुळे वर्गात दंगामस्ती करता येत नाही. आई-वडिलांनीही मास्क वापरासाठी ताकीद दिली आहे. पहिल्या आठवड्यात मास्क नसल्याने सरांनी परत घराकडे पाठविले होते, त्यामुळे आता न विसरता वापरते.
- शहनाज खाटीक, विद्यार्थीनी, मिरज
शाळेचे कपडे घेतानाच दोन मास्क घेतले होते. वर्गात लेस तुटल्यानंतर आणखी दोन घेतले. लहान भावासाठीही दोन घेतले होते. मास्कसाठी वडिलांनी शंभर रुपये खर्च केले. वर्गात मास्कसाठी सरांनी ताकीद दिल्यापासून वापरायला विसरत नाही.
- शौर्य शेळके, विद्यार्थी, सांगली
पॉईंटर्स
जिल्ह्यातील शाळांची सद्य:स्थिती
पाचवी ते आठवीच्या एकूण शाळा - १५८०
सुुरू झालेल्या शाळा - १५६०
विद्यार्थ्यांची उपस्थिती - १,६००००
शिक्षकांची उपस्थिती - ९६००
---------