विजयनगर (म्हैसाळ) येथे सरपंचपदी प्रियांका माळी व उपसरपंचपदी सारिका कोरे यांच्या निवडीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी अभिनंदन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतीचे कारभारी मंगळवारी निश्चित झाले. सरपंचपदासाठी फोडाफोडी, सदस्यांचे जुगाड आणि पळवापळवी करत कारभार्यांनी सरपंचपदे खेचून घेतली. अनेक ठिकाणी बिनविरोध सरपंच निवडी झाल्या. काही ठिकाणी आरक्षणामुळे सत्ता एका गटाची आणि सरपंच मात्र दुसऱ्याच गटाचा असे प्रकार घडले.
जानेवारीत १५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे मैदान रंगले. त्यांच्या सरपंच निवडी मंगळवारी झाल्या. जत आणि पलूस तालुक्यातील सरपंच आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले गेल्याने तेथील ४१ गावांच्या प्रक्रियेला जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली, त्यामुळे १११ ग्रामपंचायतीत मंगळवारी सरपंच निवडी पार पडल्या.
निवडणुकीत परस्पराविरोधात काटाजोड लढती लढलेल्या कारभाऱ्यांना सरपंचपदावेळी मात्र बऱ्याच तडजोडी कराव्या लागल्या. तुरचीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व भाजपला एकत्र यावे लागले. मालगावात धामणे, खोलकुंबे, कबाडगे, हुळ्ळे, सावंत गटात सरपंच निवडीत रण माजले. परस्परांविरोधात लढलेल्या गटांना सरपंचपद मिळविताना हातमिळवणी करावी लागली. मिरज तालुक्यात २२, तासगावमध्ये ३७, कवठेमहाकांळ व खानापुरात प्रत्येकी ११ गावात सरपंच निवडी झाल्या.
चौकट
विजयनगरमध्ये जाऊबाई जोरात
विजयनगर (म्हैसाळ) ग्रामपंचायतीत उपसरपंचपदी सारिका कोरे यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या त्या थोरल्या जाऊबाई आहेत. निवडणुकीत प्राजक्ता कोरे यांनी जाऊबाईंसाठी प्रचाराचे रान उठविले होते. धाकट्या जाऊबाई जिल्ह्याचा कारभार सांभाळताना आता थोरल्या जाऊबाई गावगाडा हाकतील.
चौकट
पत्नी सरपंच, पती उपसरपंच
कवठेपिरानमध्ये भीमराव माने सरपंचपदासाठी शड्डू ठोकून होते, पण महिला आरक्षण निघाल्याने चितपट व्हावे लागले. ती कसर भरून काढताना पत्नी यांना सरपंचपदी बसवले. स्वत: उपसरपंचपदाची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे पत्नी सरपंच पत्नी आणि पती उपसरपंच असा योग कवठेपिरानमध्ये आला.
चौकट
म्हैसाळमध्ये युद्ध जिंकले, पण मावळ्यात बेदिली
म्हैसाळमध्ये भाजपसह विविध गटांनी एकत्र येऊन मनोज व मनोरमा शिंदे यांच्या गडाला सुरुंग लावला. सतरापैकी पंधरा जागा ताब्यात घेतल्या. सरपंच निवडीत मात्र भाजपचा गट दुभंगला. दीपक शिंदे व पुष्पराज शिंदे असे दोन गट पडून भाजपअंतर्गतच लढत झाली. गुप्त मतदानात रश्मी आबासाहेब शिंदे सरपंच झाल्या. आता पुष्पराज शिंदे यांचा गट भविष्यात काय भूमिका घेतो याची उत्सुकता असेल.
चौकट
आरगमध्ये अपक्ष बसला खुर्चीवर
आरग येथे अपक्ष उमेदवार विनोद बुरुड यांची भूमिका निर्णायक ठरली. काँग्रेस-राष्ट्रवादीप्रणित गटाला पाठिंबा दिल्याने हा गट नऊ सदस्यांसह सत्तेवर आला. त्याचे बक्षीस म्हणून बुरुड यांना उपसरपंचपद मिळाले. भाजपप्रणित गट आठ सदस्यांसह विरोधात राहिला.
--------