शिराळा : बँकिंग नियमन कायद्यांतर्गत येथील सर्जेरावदादा नाईक सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही. परंतु बँकेचे आर्थिक व्यवहार रिझर्व्ह बँकेच्या अधीन राहून होणार आहेत. अशा पद्धतीचे दिशानिर्देश मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांच्याकडून बँकेला देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रशासक आदिनाथ दगडे यांनी दिली.
येथील सर्जेरावदादा नाईक सहकारी बँकेत झालेल्या बोगस कर्ज व्यवहारप्रकरणी प्रशासकांकडून बँक प्रशासनाचा ताबा घेण्यात आला आहे. सध्या बँकेतील सर्व व्यवहार प्रशासकाच्या अधिपत्याखाली सुरू आहेत. २०११ पासून घेतलेल्या व थकीत असलेल्या कर्जासाठी नोटिसा बजावण्याचे काम सुरू असून, काही प्रमाणात कर्जवसुली झाली आहे. बँकेचे प्रशासन रिझर्व्ह बँकेच्या घालून दिलेल्या अटीनुसारच चालणार आहे.
३ फेब्रुवारीरोजी बँक व्यवसाय बंद झाल्यापासून बँकेला निर्देश देण्यात आले आहेत. ते असे :
बँकेला कोणतेही कर्ज आणि ॲडव्हान्स नूतनीकरण करता येणार नाहीत, कोणतीही गुंतवणूक परस्पर करता येणार नाही, पैसे उधार देण्यास, नवीन ठेवी स्वीकारण्यास, कोणतेही देयक वितरित किंवा करण्यास मंजुरी नाही, कोणत्याही तडजोडीमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये प्रवेश आणि विक्रीकरिता हस्तांतरित करता येणार नाहीत, कोणतीही मालमत्ता विल्हेवाट लावण्यास सहमती असणार नाही, त्याचे उत्तरदायित्व आणि जबाबदाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बँकेला देण्यात आलेल्या नाहीत.
बँकिंग परवाना रद्द करण्यात आलेला नाही. बँकिंग कार्य आगामी काळात सुरू ठेवले जाणार आहे. याशिवाय सर्व बँक बचत खाती, चालू खात्यावरून पाचशेवर रुपये काढण्यास परवानगी मिळणार नाही. हा नियम सहा महिन्यांसाठी लागू राहणार असल्याचे दगडे यांनी सांगितले.