प्रताप बडेकर-- कासेगाव--दहा वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आलेल्या अनंत अडचणी... परिस्थितीमुळे भोगलेल्या यातना... त्यावेळी केलेला एक पक्का निर्धार... पुढे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी पदावर काम करत असताना शालेय वर्गमित्रांना सोबत घेऊन ‘संस्कार संकुल’ची उभारणी... अन् सुरू झाला असा एक प्रवास. की ज्यामधून ग्रामीण भागातील शेकडो होतकरू हुशार विद्यार्थ्यांना मिळाले आहे हक्काचे घर... ते म्हणजे अभ्यासपीठ..!कासेगाव (ता. वाळवा) येथील विनायक विजय औंधकर (वय ४०, सध्या आळंदी नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत) यांनी दहा वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. यावेळी त्यांना अनेक अडचणी आल्या. घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे पुणे येथे अभ्यासासाठी स्वतंत्र खोली घेणे आवाक्याबाहेर होते. त्यामुळे ते काही दिवस नातेवाईकांजवळ राहिले. नंतर खोलीचा शोध सुरू केला. रेल्वे स्टेशनलगत एक खोली मिळाली. मात्र नेहमीच्याच कर्कश्श आवाजाने अभ्यासाची एकाग्रता होत नव्हती. शेवटी एका मित्राकडे अभ्यासासाठी जायला सुरुवात केली. दिवसभर पुण्यात सर्वत्र कामासाठी फिरत व रात्रीच्यावेळी अभ्यासासाठी मित्राकडे जात होतो. त्याचवेळी एक निश्चय केला की आपले ध्येय गाठण्यासाठी ग्रामीण भागातून शहरांकडे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्या भागातच सर्व सोयींनीयुक्त संकुल उभारायचे.औंधकर यांची काही वर्षातच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी पदावर निवड झाली. त्यांनी गावी आल्यानंतर वर्गमित्रांना एकत्र करून आपली योजना त्यांना सांगितली. वर्गमित्रांनीही त्यांना सहकार्याची तयारी दाखवली. काही महिन्यातच कासेगावात सर्व सोयींनीयुक्त असे तीनमजली संस्कार संकुल उभे राहिले.या संकुलात एकूण २१ खोल्या असून, स्वतंत्र अत्याधुनिक हॉल आहे. अभ्यासिकेसाठी दोन हॉल आहेत. प्रत्येक वर्गामध्ये ४ विद्यार्थ्यांसाठी ४ बेड आहेत. प्रत्येक वर्गात थंड व गरम पाणी, शौचालय अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ही सर्व व्यवस्था अगदी नाममात्र दरात आहे.संकुलामार्फत गोरगरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने घेत आहेत. दर आठवड्याला यशस्वी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन वर्ग होत आहेत. दहावी, बारावी, विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग, योग वर्ग, ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी आरोग्यविषयक वर्ग, वारकरी संप्रदायाकरिता कीर्तनाची मोफत आॅडीओ सोय केली आहे. या संकुलात सुसज्ज ग्रंथालय असून, स्पर्धा परीक्षांची सर्व पुस्तके मोफत पुरवली जात आहेत. विनायक औंधकर दर आठवड्याला स्वत: उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या अनुपस्थितीत या संकुलाची जबाबदारी त्यांचे शालेय वर्गमित्र बंडा पाटील, डॉ. सुदाम आडके, उत्तम सपकाळ, डॉ. अधिक शेळके, संतोष भांबुरे, नितीन मंडले, महेश कुलकर्णी, उमेश पाटील, मच्छिंद्र लोहार, अनिल आडके, विकास जगताप पार पाडत आहेत.म्हणून ‘संस्कार संकुल’संस्कार संकुल नामकरणाविषयी विनायक औंधकर यांना विचारले असता ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी गावाकडे आलो असताना रात्रीच्यावेळी एका चौकात तरुणांच्या दोन गटात संघर्ष सुरू होता. यावेळी पाचशेपेक्षा जास्त युवक हातात तलवारी, काठ्या घेऊन रस्त्यावर उभे होते. हे दृष्य पाहून खूप वाईट वाटले. या तरुणांना योग्य संस्कार न मिळाल्यानेच ते वाममार्गाला लागले. यापुढील पिढी तरी सुसंस्कारित व्हावी, यासाठी संस्कार संकुल असे नाव दिले.
‘संस्कार संकुल’ ठरतेय हक्काचं ‘अभ्यासपीठ’
By admin | Updated: November 30, 2015 01:06 IST