सांगली : मिरजेचे तत्कालीन प्रांताधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांचा विश्रामबाग येथील ‘अथर्व’ बंगला फोडून चोरट्यांनी एलसीडी, टीव्ही, संगणक व सीसी टीव्हीचे डीव्हीआर यंत्र असा एक लाखाचा माल लंपास केला आहे. शनिवारी रात्री चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कुलकर्णी यांचे बंधू पवन कुलकर्णी (रा. पापरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्रिगुण कुलकर्णी हे कुटुंबासह ‘अथर्व’ बंगल्यात रहात होते. त्यांनी हा बंगला भाड्याने घेतला होता. त्यांची महिन्यापूर्वी बुलढाणा जिल्ह्यात प्रांताधिकारी पदावर बदली झाली आहे. २ एप्रिलला ते कुटुंबासह बुलढाण्याला गेले आहेत. त्यांनी अद्याप साहित्य नेले नाही. बंगल्यात कुणीही रहात नाही. चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराचा कोयंडा कटावणीने तोडून आत प्रवेश केला. साहित्य विस्कटून टाकले. त्यानंतर एलसीडी, संगणक व सीसीटीव्हीचे डीव्हीआर यंत्र असा एक लाखाचा माल पळविला. शनिवारी सकाळी शेजारी राहणाऱ्या फडतरे कुटुंबियांना बंगल्याचा दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. मात्र बंगल्यात कोणीही नसल्याचे लक्षात येताच त्यांनी त्रिगुण कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. सायंकाळी त्यांचे बंधू पवन यांनी विश्रामबाग ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक धनंजय भांग, गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सहाय्यक निरीक्षक भगवान शिंदे यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. श्वान शंभरफुटी रस्त्यावरील पलूस सहकारी बँकेपर्यंत गेले. ठसे तज्ज्ञांना ठसे मिळाले आहेत. त्याआधारे तपास केला जात आहे. रविवारी सायंकाळी पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी गुन्हे प्रगटीकरण शाखेची बैठक घेऊन तपासाविषयी मार्गदर्शन केले. रात्री उशिरापर्यंत सहाय्यक निरीक्षक भगवान शिंदे यांच्या पथकाकडून संशयित व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध सुरू होता. मात्र हाती काहीच लागले नव्हते. (प्रतिनिधी)
सांगलीत प्रांतांचा बंगला फोडला
By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST