सांगली : तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपा आमदार राम कदम यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने गुरुवारी विश्रामबाग पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली. याबाबतची रितसर तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विनया पाठक, नगरसेविका संगीता हारगे, राधिका हारगे, आयेशा शेख, स्वाती पारधी, सुनीता लालवाणी, छाया मोरे आदींनी हे निवेदन विश्रामबाग पोलीस निरीक्षक अशोक तनपुरे यांना दिले. तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तक्रारीत म्हटले आहे की, राम कदम यांनी ४ सप्टेंबर रोजी मुंबईतील एका दहीहंडीच्या कार्यक्रमात, तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्याचे वक्तव्य जाहीररीत्या केले. या माध्यमातून त्यांनी राज्यातील तमाम महिला वर्गाचा विनयभंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. विनया पाठक म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडविताना, परस्त्री मातेसमान, ही शिकवण दिली. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर महाराष्ट्र वाटचाल करीत असताना, सरकारमधील एक आमदार शिवरायांच्या याच तत्त्वाला काळिमा फासण्याचा प्रयत्न करीत आहे. वास्तविक मुलींना पळवून आणण्याची धमकी देऊन एक प्रकारे सर्व महिला वर्गाचा विनयभंगच त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विनयभंगाचीच तक्रार दाखल करण्यात यायला हवी.सत्ताधारी आमदार म्हणून अशा लोकांना पाठीशी घातले जाणार, की महिला वर्गाचा मान राखला जाणार, हे लवकरच जनतेला कळेल. सरकार खरेच महिलांच्या बाजूने असेल, तर ते अशा आमदारावर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांना सूचना देईल. आम्ही या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. जर सरकारने राम कदम यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यानंतर उद्भवणा-या परिस्थितीस पोलीस जबाबदार राहतील, असेही पाठक म्हणाल्या.
राम कदम यांच्याविरुद्ध सांगलीत विनयभंगाची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 6:46 PM