सांगली : स्टोन क्रशरच्या व्यवसायातून सांगलीच्या एका तरुणाला सोशल मीडियाद्वारे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रोहितकुमार धीरजकांत गुप्ता (वय २९, रा. खणभाग, सांगली) याने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी इम्तियाज रशीद कोप्पळ (रा. केशवपूर, हुबळी, जि. धारवाड, कर्नाटक) याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तिम्मनकट्टी बेहरीन पाडा (जि. हवेरी) येथील कामाच्या स्थळावर स्टोन क्रशिंग करून देण्याबाबत रोहितकुमार याच्या कुबेर स्टोन क्रशर व इम्तियाजच्या एनआय इन्फ्रा सोल्युशन यांच्यात जानेवारी २०२० मध्ये सांगलीत करार केला. त्यानुसार रोहितकुमार याने ९० लाखाची क्रशर यंत्रसामग्री खरेदी करून इम्तियाजला दिली. करारानुसार क्रशर बसवून ते कार्यान्वित करूनही दिले. काही काळानंतर यंत्र बंद पडल्याने कराराप्रमाणे देय असलेली १६ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम रोहितकुमारने संशयितांकडे मागितली. त्यावर इम्तियाजने या रकमेसह यंत्र व साहित्य परत न करण्याची धमकी दिली, तसेच रोहितकुमारकडे ३ कोटी ४ लाख रुपयांची खंडणी व्हाॅट्स ॲपद्वारे मागितली. ही रक्कम दिली तरच यंत्रसामग्री परत करू, ती नेण्यासाठी कर्नाटकात आला तर पाय तोडू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.