महावितरण विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार सांगली शहरातील मुख्य विद्युत वाहिनीस अनेक झाडांच्या फांद्या घासत आहेत. यामुळे अनेकवेळा विद्युत तारा एकमेकांना चिकटून बिघाड होतो. वादळी वाऱ्यामुळे फांद्यावर पडून मोठा अपघात होण्याची शक्यताही असते. त्या तोडण्याच्या कालावधीत महावितरणच्या सांगली शहर विभागातून ज्या भागामध्ये वीजपुरवठा होतो, तो बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे कोल्हापूर रस्ता, शंभरफुटी रस्ता ते सांगली मार्केट यार्ड, वखारभाग, खणभाग, गावभाग, बायपास रस्ता, वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय परिसर, कृष्णा नदीच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित होणार आहे. हिराबाग आणि सांगली शहरासाठी पाणी उपसा करणाऱ्या पंपांचा वीज पुरवठाही खंडित होणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता विनायक विधाते यांनी दिली.
चौकट
या भागात वीज पुरवठा सुरळीत
विश्रामबागपासून मिरजेपर्यंत, यशवंतनगर, संजयनगर, घन:शामनगर, माळबंगा, चिंतामणीनगर, वसंतदादा कारखान्यासमोरील भागात वीज पुरवठा सुरळीत राहणार आहे, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता विधाते यांनी दिली. माळबंगला येथून पाणी पुरवठा होत असलेल्या पंप हाऊसचा वीज पुरवठाही सुरळीत राहण्याची शक्यता आहे.