लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : व्हिजन सांगली फोरमच्या वतीने जिल्ह्याचा पर्यटनाचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य व केंद्र शासनासह खासगी गुंतवणूकदारांच्या मदतीने शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करण्याची शिफारस करण्यात आली. गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी व महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांच्याकडे पर्यटन आराखडा सुपूर्द करण्यात आला.
याबाबत फोरमचे समन्वयक सुरेश पाटील म्हणाले की, जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. सांगलीत कृष्णा नदीला दोन्ही बाजूला घाट वाढवून बोटिंगची सुविधा करता येऊ शकते. काळी खणीत कारंजे, झुलता पूल, म्युझिकल फाउंटन गार्डन, तरंगते हॉटेल अशांची सुविधा करण्याची गरज आहे. सांगलीच्या शेजारी दहा एकर जागेवर नाशिकच्या धर्तीवर फ्लॉवर गार्डन, मेडिकल टुरिझम, आयुर्वेदिक उपचार सेंटर हेही जिल्ह्यात प्रमुख आकर्षण ठरेल.
मिरजेतील मिरासाहेब दर्गा, दंडोबा डोंगर, गिरलिंग डोंगर, रामलिंग बेट आदी ठिकाणी पर्यटनाची मोठी संधी आहे. सागरेश्वर अभयारण्यात पर्यटकांसाठी बांबू हाऊसेस, टेंट हाऊसेस, ॲडव्हेंचर पार्क, उद्यान, पक्षी निरीक्षण थांबे, मनोरे आदी उभा करता येऊ शकतात. उमराणी येथे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची समाधीस्थळ, संखचा तलाव, गुड्डापूर येथील दानम्मा देवी देवस्थानाचा विकास होऊ शकेल.
आरेवाडीचे देवस्थान, खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिर, स्वतंत्रपूर येथील खुले कारागृह, भिवघाट, शुकाचार्य, चौरंगीनाथ हे चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकतील. माडगूळ येथील ग. दि. माडगुळकर यांचे जन्म ठिकाण हे विद्याथीं व लोकांच्या सहलीसाठी त्याचा उपयोग करता येईल. जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब फळबागांना भेटी, शेती पाहणी व शेतावर मुक्काम, टेंट हाऊस, ग्रामीण जीवन व संस्कृती दर्शन राज्य, देश आणि परदेशातील व्यावसायिकांना आणि व्यापाऱ्यांना येथे येऊन या सर्व सुविधांचा लाभ मिळेल. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून निधीसाठी पाठपुरावा करावा लागले. तसेच काही जागा खासगी गुंतवणुकदारांना विकसित करण्यास देता येतील, असेही पाटील म्हणाले.
चौकट
चांदोलीत सुविधा
चांदोली धरणामध्ये बोटिंग, वॉटर स्पोर्टस, ट्रेकिंगची सुविधा, प्राणी-पक्षी निरीक्षण थांबे, जंगलामध्ये टेन्ट हाउस तयार करता येई शकतो. कांडवण येथे उत्तम ट्रेकिंग पॉइंट होऊ शकतो. चांदोली अभयारण्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे करता येईल, असेही पाटील म्हणाले.