सांगली : जिल्ह्यात आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत क्रमांक एकसाठी चढाओढ सुरू होती. विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून भाजपने ही गादी खेचली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून दोन्ही काँग्रेसमध्ये जिल्ह्यातील क्रमांक एकच्या जागेसाठी संघर्ष सुरू आहे. गेल्या दहा वर्षात ग्रामपंचायतीपासून स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारून सर्वात मोठ्या पक्षाचे स्थान मिळविले. मात्र गेल्या वर्षभरात राष्ट्रवादीचे अर्धा डझन नेते भाजप व शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला. त्यामुळेच राष्ट्रवादीचे हे स्थान हिसकावून घेऊन भाजप आता सर्वात ताकदीचा पक्ष बनला आहे. (प्रतिनिधी)समीकरणे बदलणारभाजप व शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यामुळे ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत सर्वच पातळ्यांवरील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. बदलत्या राजकीय नाट्याची ही नांदीच ठरणार आहे. भाजपची जोरदार मुसंडी...सांगली : काँग्रेसचे पानिपत आणि राष्ट्रवादीला धक्का देत भाजपने आठपैकी चार जागांसह सांगली जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसने इतिहासातील सर्वात खराब कामगिरी करताना केवळ एकच जागा जिंकली. राष्ट्रवादीला एका जागेचे नुकसान झाल्याने माजी मंत्री जयंत पाटील व आर. आर. पाटील यांची नामुष्की झाली आहे. शिवसेनेने एक जागा जिंकून दोन्ही काँग्रेसच्या दु:खात भर टाकली. विधानसभेच्या या निकालामुळे आता जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. जिल्ह्यात सर्वात धक्कादायक निकाल म्हणून सांगली विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जात आहे. याठिकाणी मदन पाटील यांचा भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी पराभव केला. पहिल्या फेरीत शिवसेनेचे पृथ्वीराज पवार आघाडीवर होते. त्यानंतरच्या तीन फेऱ्यांमध्ये मदन पाटील आघाडीवर गेले. सुरुवातीला गाडगीळ तिसऱ्या क्रमांकावर होते. नंतर त्यांनी जोरदार मुसंडी मारत गड काबीज केला. सांगलीतील निकाल फेऱ्यागणिक अधिक रंगतदार होत गेल्याने याठिकाणच्या निकालाबाबत उत्सुकता लागली होती. पलूस-कडेगाव मतदारसंघातही असेच चित्र होते. काँग्रेसचे पतंगराव कदम व भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांच्यात सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये चढाओढ दिसून आली. तासगाव विधानसभा मतदारसंघातही आर. आर. पाटील सुरुवातीला पिछाडीवर होते. नंतर त्यांनी मताधिक्य राखून अजितराव घोरपडेंचा पराभव केला. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीला धक्का,शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसचे पानिपतसांगली विधानसभा मतदारसंघात राजकीय तज्ज्ञांचे अंदाज धुळीस मिळवित भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव केला. शिवसेनेचे पृथ्वीराज पवार यांना तिसऱ्या, तर राष्ट्रवादीचे सुरेश पाटील यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.मिरज विधानसभा मतदारसंघात सुरेश खाडे यांनी दुसऱ्यांदा विजय मिळविला. गत निवडणुकीपेक्षा त्यांनी दहा हजार जास्त मताधिक्य मिळवून अनेकांचे अंदाज फोल ठरविले. काँग्रेसचे सिद्धार्थ जाधव, अपक्ष उमेदवार सी. आर. सांगलीकर आणि शिवसेनेचे तानाजी सातपुते यांना पराभवाचा धक्का बसला. खानापूर मतदारसंघात माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना शिवसेनेचे अनिल बाबर यांना १९ हजार ७९७ मतांनी पराभूत करून गत दोन पराभवांचा वचपा काढला. बाबर यांच्या निमित्ताने शिवसेनेने जिल्ह्यात प्रथमच खाते उघडले आहे. भाजपचे गोपीचंद पडळकर यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. जत येथे भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांनी काँग्रेसचे विक्रम सावंत यांचा पराभव केला. जगताप यांना १७ हजार ६९८ चे मताधिक्य मिळाले. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांचा फारसा प्रभाव या निवडणुकीत पडला नसल्याने ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. जगतापांना अन्य पक्षांचीही मदत मिळाली. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव विधानसभा मतदारसंघात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी भाजपचे अजितराव घोरपडे यांचा पराभव केला. अप्रत्यक्षरित्या ही लढत खासदार संजय पाटील आणि आर. आर. पाटील यांच्यात होती. त्यामुळे या निकालातून संजय पाटील यांनाही धक्का बसला आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी अपक्ष उमेदवार अभिजित पाटील यांचा ७५ हजार २२६ मतांनी पराभव केला. जिल्ह्यातील हा सर्वात मोठ्या मताधिक्याचा विजय आहे. काँग्रेसचे जितेंद्र पाटील यांचा प्रभाव पडला नाही. जयंत पाटील यांच्या पराभवासाठी विरोधक एकत्र येऊ शकले नाहीत. शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांचा 3 हजार ६६८ मतांनी पराभव केला. काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. हा विजय जिल्ह्यातील सर्वात कमी मताधिक्याचा आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघात काँगे्रसचे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी भाजपचे पृथ्वीराज देशमुख यांचा २४ हजार ३४ मतांनी पराभव केला. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू होती. नंतर पतंगरावांनी आघाडी कायम राखली. त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली.
सांगली जिल्ह्यात भाजप क्रमांक एकवर
By admin | Updated: October 20, 2014 00:42 IST