ओळी :-
केंद्रातील मोदी सरकारविरोधात रविवारी सांगलीत काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यात विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, आदिनाथ मगदूम, बिपीन कदम, आण्णासाहेब कोरे सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : केंद्रातील मोदी सरकारने सात वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेचे जगणेच हराम केले आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गालाही मोदी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप करत रविवारी सांगलीत काँग्रेसच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
शहरातील काँग्रेस कमिटीसमोर वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या सात चुकीच्या निर्णयांचे प्रतिकात्मक पुतळे हातात घेऊन कार्यकर्त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. विशाल पाटील म्हणाले की, ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सात वर्षांत सर्वसामान्य जनतेला जगण्यासाठी वाईट परिस्थिती निर्माण केली आहे. हे सरकार केवळ दिखाव्याचे आहे. या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे देशाला वाचविण्यासाठी सत्तांतराची गरज आहे.
पृथ्वीराज पाटील म्हणाले की, सर्वसामान्य जनतेच्या स्वप्नांचा मोदी सरकारने चुराडा केला आहे. पेट्रोलने शंभर गाठली आहे, महागाई वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यासही हेच सरकार जबाबदार आहे. लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केल्याचे सांगितले जाते. तरीही जनतेला लस मिळत नाही. देशातील लस निर्यात करून मोदींनी जनतेचा घात केला आहे. केवळ अंबानी, अदानींचेच भले करणारे हे सरकार आहे.
या आंदोलनात आदिनाथ मगदूम, बिपीन कदम, विजय आवळे, आण्णासाहेब कोरे, अजित ढोले, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.