फोटो २९०१२०२१एसएएन०३ : सांगलीच्या गणेशनगरमधील नदाफ बिल्डिंगमध्ये मैनुद्दीन मुल्लाचा खून झाल्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडवून देणाऱ्या वारणानगर येथील नऊ कोटी रुपये चोरीतील प्रमुख संशयिताचा कोयत्यासारख्या धारदार हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला. मैनुद्दीन ऊर्फ राजा अबुबकर मुल्ला (वय ४४, रा. ख्वाजा वस्ती, मिरज, मूळ रा. जाखले, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे मृताचे नाव असून, शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास येथील गणेशनगरमध्ये ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुल्ला मिरजेत राहण्यास असला, तरी सांगलीतील गणेशनगर परिसरात नेहमी येत होता. शुक्रवारी रात्रीही तो कामानिमित्ताने या परिसरात आला होता. रात्री साडेआठच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चार ते पाचजणांनी हातात कोयत्यासारखी धारदार हत्यारे घेऊन त्याचा पाठलाग सुरू केला. हल्ल्याच्या भीतीने पळत तो नदाफ बिल्डिंगमध्ये शिरला व दरवाजा उघडण्यासाठी दरवाजा ठोठावू लागला. मात्र, तेथील कोणीच दरवाजा उघडला नाही. एवढ्यात पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी त्यास पहिल्या मजल्यावर जिन्यामध्येच गाठत त्याच्या डोक्यात आणि मानेवर वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेचा तपास सुरू केला. श्वानपथकासह फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला. पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, अनिल तनपुरे यांच्यासह पथक घटनास्थळी उपस्थित होते. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.
चाैकट
मुल्ला वारणानगर चोरीतील संशयित
मैनुद्दीन मुल्ला वारणानगर येथील संस्थेच्या वाहनावर चालक होता. तेथील नऊ कोटी रुपयांच्या चोरीतील तो मुख्य संशयित होता. १२ मार्च २०१६ रोजी मिरजेच्या बेथेलनगर येथील मुल्लाच्या घरात तीन कोटी १८ लाख रुपये सापडले होते. या प्रकरणात त्यास अटक झाल्यानंतर तपासासाठी पोलीस त्याला घेऊन गेले होते. यावेळी पोलीस पथकानेच तेथील सहा कोटी रुपये लंपास केल्याबद्दल कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. या प्रकरणात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह मुल्ला यास अटक करण्यात आली होती. सीआयडीसह कोल्हापूर पाेलिसांनी त्याची चौकशीही केली होती. घटनेनंतर काही दिवसांनी तो जामिनावर बाहेर आला होता.