अविनाश कोळीसांगली : निवडणुकांची लगीनघाई सुरू असतानाच भाजपच्या मांडवात संशयकल्लोळ निर्माण झाला. ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’,चा सूर अन् त्यावरील राग आमदारांनी आळवताच पालकमंत्र्यांच्या दरबारी छुप्या राजकीय खेळीच्या शंकांचे धुके दाटले. ऐन थंडीत भाजपच्या घरात वातावरण तापले असताना भाजपच्या नावाने बोटे माेडणाऱ्या विरोधकांच्या अंगणात फटाके फुटले. तेही देवदिवाळीचे बरं. भाजपच्या संसारात बिब्बा घातला तरी कुणी, असा अस्वस्थ सवाल करताना साऱ्यांकडे संशयाने पाहण्याचे काम मंत्रीस्तरावर सुरू झाले आहे.विधानसभेला महाविकास आघाडीचा गड काबीज करताना महायुतीने विशेषत: भाजपने विरोधकांचा तंबू रिकामा करण्याचा विडा उचलला. सारं मनासारखं घडतही गेलं. विरोधकांनी स्वत:हून तंबू रिकामा करीत भाजपचा उंबरठा ओलांडला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आलेल्या पाहुण्यांना सुखी संसाराची आश्वासने दिली. नव्याची नवलाई सुरूही झाली.निवडणुकीची लगीनघाई सुरू झाल्यानंतर प्रत्येक पाहुण्याला घरात जागा करून देत वाटणीचा शब्दही दिला गेला अन् तिथेच पाल चुकचुकली. वास्तविक घरे आमदारांनी बांधलेली. त्यामुळे आमच्या घरातले निर्णय आम्हाला विचारात न घेता कसे काय होऊ शकतात, असा प्रश्न सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ अन् मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या मनपटलावर दाटला. अखेर जाहीररित्या ही अस्वस्थता व्यक्तही झाली. पालकमंत्र्यांच्या निर्णयांवर, आश्वासनांवर बोट ठेवले गेले. काहीतरी आक्रीत घडतंय, हे एव्हाना दादांना कळून चुकलं. आमच्या सुखी संसारात बिब्बा कालवू नका, असा संताप त्यांनी व्यक्त केला. पण, बिब्बा घातलंय तरी कोण, असा प्रश्न निष्ठावंत अन् नव्याने आलेल्या आयाराम नेत्यांच्या कार्यकर्त्यांनाही पडलाय.
शेजाऱ्यांच्या घरात आनंदएकीकडे भाजपच्या घरात लगीनघाई अन् संशयकल्लोळ दोन्हीही सुरू असताना शेजारच्या विरोधकांच्या घरात फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. त्यांच्या घरीही लगीनघाई सुरू आहे. पण, फारसा गाजावाजा न करता, संशयाचे खांब उभे न करता. त्यामुळे चंद्रकांतदादांचा त्यांच्यावरही संशय बळावलाय. या साऱ्यांमागे विरोधक तर नसतील ना, अशी शंकाही व्यक्त होत आहे.
नाराजी इकडेही अन् तिकडेहीअमिताभ यांचे ‘मेरे अंगने में...’ या गाण्यापाठोपाठ त्यांच्याच ‘मै और मेरी तनहाई’ या गाण्याचे बोल भाजपच्या मांडवात घुमत आहेत. ‘मजबूर ये हालात इधर भी है उधर भी. कहने को बहोत कुछ है पर किससे कहे हम, कब तक युंही खामोश रहे और सहे हम!’ निष्ठावंत अन् आयाराम अशा दोन्ही गटातील भावना या गाण्यातून व्यक्त झाल्या. आता त्या कोणाला कळणार की नाही, हा प्रश्न आहे.
मित्रमंडळी, आप्तस्वकीय स्तब्धलग्नाच्या मंडपात जमलेली मित्रमंडळी अन् आप्तस्वकीय मात्र, भाजपच्या घरातील कलहाने स्तब्ध झाले आहेत. यांचे मिटल्याशिवाय आपले मिटणे कठीण दिसते, याचा अंदाज आल्याने त्यांनी ‘एकला चलो’चा नारा देत तयारी सुरू केली आहे. युतीचे सूर जुळोत अथवा न जुळोत, आपली पायवाट आपण तयार करायचीच, हा निर्णय मित्रपक्षांनी घेतलाय.
अंतरपाट हटणार की नाहीनिष्ठावंत अन् आयाराम यांच्यात एक अंतरपाट सध्या दिसत आहे. आरोपांच्या अमंगल स्वरांना पूर्ण विराम देत मंगलाष्टका म्हटल्या जाणार का? दोघांच्यात घट्ट धरलेला अंतरपाट हटणार का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांना सतावत आहेत. त्याची भविष्यवाणी करणेही कठीणच.
Web Summary : Sangli BJP faces turmoil as election nears. Accusations of favoritism toward newcomers strain relations between veteran leaders and the party leadership, fueling uncertainty and opposition glee.
Web Summary : सांगली भाजपा में चुनाव नजदीक आते ही उथल-पुथल। नए लोगों के प्रति पक्षपात के आरोपों ने अनुभवी नेताओं और पार्टी नेतृत्व के बीच संबंधों को तनावपूर्ण बना दिया, जिससे अनिश्चितता और विपक्ष में खुशी है।